पाथर्डीमध्ये थकबाकीदारांचे नऊ गाळे सील
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी नगरपरिषदेने कारवाईचा बडगा दाखवून नगरपरिषद मालकीच्या गाळेधारकांनी भाडे थकविल्याने प्रशासनाने नऊ गाळ्यांना सील ठोकले.
दोन तासांत एक लाख पंधरा हजार रुपयांची वसुली झाली. शहरातील सर्वच गाळेधारकांनी भाड्याची रक्कम तातडीने पालिकेकडे भरावी, अन्यथा यापेक्षाही कडक कारवाई पालिका करील, असा इशारा मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी दिला. पालिकेचे शहरात सुमारे शंभर गाळे आहेत. ते गाळे भाड्याने दिले आहेत. काही गाळेधारक भाड्याची रक्कम पालिकेला भरत नाहीत.
नोटिसा व तोंडी सूचना देऊनही भाडे भरले जात नाही. वसूल झाला नाही, तर पालिकेला उत्पन्नाची साधने नाहीत. वरिष्ठ अधिकर्यांनी मालमत्ताकर, गाळेभाडे व पाणीपट्टी वसुली करण्यासाठी सक्त सूचना दिल्या आहेत. कोरोना काळात केवळ 38 टक्के वसुली होती. आम्ही वरिष्ठांना 75 टक्के वसुली केली जाईल, असे प्रतिज्ञापत्र दिले आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यासोबत राज्यातील पालिकेच्या अधिकार्यांची बैठक आहे. त्यामुळे वसुली मोहीम अधिक कडक केली आहे. कारवाईत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे, कर निरीक्षक सोमनाथ गर्जे, संजय खोर्दे, त्र्यंबक घुले, कृष्णा फळे, नंदू गोला, अरुण सोनटक्के, बाळू डोमकावळे, अशोक डोमकावळे, महेश कवादे, सोमनाथ धरम, शुभम काळे, सौरभ दिनकर, हरी पवार, हरी भालेराव सहभागी होते.
कारवाईच्या मोहिमेत वीर सावरकर मैदान येथील बाजारतळावरील नगरपरिषदेचे नऊ गाळे भाडे थकल्याने सील केले. त्यानंतर काही गाळाधारकांनी तातडीने भाडे भरले. दोन तासांत एक लाख पंधरा हजारांची वसुली झाली. अचानक गाळे सील झाल्याने गाळेधारकांची धाबे दणाणले आहेत.