विखे समर्थक हराळ राष्ट्रवादीच्या वाटेवर ; नगर तालुक्यात विखेंना बसणार झटका
By Admin
विखे समर्थक हराळ राष्ट्रवादीच्या वाटेवर ; नगर तालुक्यात विखेंना बसणार झटका
नगर सिटीझन live team-
माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे नगर तालुक्यातील कट्टर समर्थक बाळासाहेब हराळे हे राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश ...
अहमदनगर : माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे नगर तालुक्यातील कट्टर समर्थक बाळासाहेब हराळे हे राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत. बाळासाहेब हराळ हे विखे पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते असून जिल्हा परिषदेचे ते माजी सदस्य आहेत. हराळ यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने विखे पाटील यांना जोरदार झटका बसणार आहे. नगर तालुक्यातील त्यांच्या समर्थकांमध्येही यामुळे चलबिचल होणार आहे. जळगाव आणि सांगली महापालिकेमध्ये आघाडीने भाजपला आस्मान दाखवल्यानंतर आता भाजपला आणखी एक झटका बसणार आहे.
नगर जिल्ह्यातील भाजप व विखे समर्थक राष्ट्रवादीच्या वाटेवर जात असल्याने भाजपला त्याचा फटका बसणार आहे.
मनसुख हिरेन, सचिन वाझे आणि आता परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे मागील काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याचे म्हटले जात आहे. मात्र, असे असले तरी राज्यात पक्षीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. सांगली आणि जळगामध्ये सत्ता मिळवल्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा आत्मविश्वास दुणावला आहे. भाजपचे अनेक नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ हेसुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लवकरच हराळ यांचा पक्षप्रवेश होईल.
तनपुरे-लंकेंचा पुढाकार
राष्ट्रवादी प्रवेशाबाबत हराळ यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक झाली. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. हराळ यांचा पक्षप्रवेश निश्चित असून त्यांच्या पत्नी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य आहे. हराळ यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्यानंतर मी या आधीच अनेकजण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते, असे वक्तव्य तनपुरे यांनी केले. तसेच हराळ यांच्या प्रवेशानंतर नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार असल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, सांगली आणि जळगाव महापालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये आघाडीच्या तिन्ही पक्षांनी मिळून भाजपला आस्मान दाखवले. सांगली महापालिकेमध्ये भाजपचे नगरसेवक फोडून राष्ट्रवादी-काँग्रेसने सत्ता काबीज केली. तर जळगावमध्ये शिवसेनेने भाजपचे तब्बल 27 नगरसेवक फोडून महापालिकेवर भगवा फडकवला. त्यानंतर आता नगर जिल्ह्यात हराळ यांच्या रुपात भाजपला मोठा धक्का बसला आहे. अर्थात हा भाजपला धक्का जरी असला तरी सर्वाधिक धक्का विखे यांना आहे. कारण, हराळ हे कट्टर विखे समर्थक
आहेत. त्यामुळे हराळ यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश हा नगर तालुक्यातील राष्ट्रवादीची ताकद वाढवणारा असला तरी विखे व भाजप यांची नगर तालुक्यातील ताकद कमी करणारा आहे. त्यामुळेच हराळ यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा नगर तालुक्यात आहे.