महाराष्ट्र
35006
10
जलजीवन'चे काम बंद पाडण्यामागे सरकारचा हात, आमदार गडाख यांचा घणाघात
By Admin
जलजीवन'चे काम बंद पाडण्यामागे सरकारचा हात, आमदार गडाख यांचा घणाघात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जलजीवन पाणीपुरवठा योजने'च्या घोडेगाव ता.नेवासा - 48 कोटी रुपयांचे काम महसूल खात्याने ठेकेदारावर अडीच कोटी रुपये दंड ठोकून काम बंद पाडले. याप्रकरणी घोडेगाव येथे संतप्त ग्रामस्थांनी नगर-संभाजीनगर महामार्गावरील शनिशिंगणापूर चौफुल्यावर रास्ता रोको आंदोलन करून मिंधे सरकारचा जाहीर निषेध केला.
जलजीवन'चे काम बंद पाडण्याचा राज्य सरकारचा हात असल्याचा घणाघाती आरोप आमदार शंकरराव गडाख यांनी केला.
या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व आमदार शंकरराव गडाख यांनी केले. यावेळी त्यांनी भाजप-शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार फटकेबाजी करून सरकारच्या इशाऱयावर चालणाऱया अधिकाऱयांना जाब विचारला. घोडेगाव पाणीपुरवठा योजनेच्या कामात अधिकाऱयांनी षडयंत्र रचले. ठेकेदाराला मोठय़ा प्रमाणात दंड केल्याप्रकरणी हे काम बंद पडले असून, विरोधकांचा व सरकारचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला.
पुढे गडाख म्हणाले, नेवासा तालुक्यात माझ्या मंत्रिपदाच्या काळात मंजूर झालेल्या साडेचारशे कोटींच्या पाणी योजना रखडल्या असून, गेल्या वर्षभरापासून सरकारने हे कामे बंद पाडले असून, एक रुपयाचा निधी दिला नाही. घोडेगाव येथील पाणी योजनेच्या कामात ठेकेदाराने रॉयल्टी भरली नाही, मुरूमची चोरी झाली, यासाठी वरिष्ठ स्तरावरून दिलेल्या आदेशानेच ठेकेदारावर अडीच कोटी रुपयांचा दंड केला. यासंदर्भात मी जिल्हाधिकारी व भूमिलेख अधिकारी यांना फोन केला असता त्या अधिकाऱयांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
सरकार येते-जाते. उद्या आमचे सरकार येईल, कागदी घोडे नाचणाऱया महसूल भूमिअभिलेख अधिकाऱयांना सोडणार नाही, गाठ माझ्याशी आहे, असा इशारा त्यांनी अधिकाऱयांना दिला. मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडले असून, पाटाखालील शेतकऱयांचे विजेचे ट्रान्सफार्मर वीस दिवस बंद ठेवण्याच्या निर्णयाचा विरोध करून याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे पाटबंधारे कार्यकारी अधिकाऱयांना सुनावले.
या आंदोलनादरम्यान तहसीलदार सचिन बिराजदार तसेच प्रांत अधिकारी सुधीर पाटील यांनी ठेकेदारावर केकेला दंड मागे घेण्यासाठी शासनाला कळवू, असे आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी नानासाहेब रेपाळे, शरद सोनवणे, डॉक्टर वैरागर, सचिन चोरडिया, राजेंद्र पाटोळे यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.
महामार्गावरील वाहतूक वळवली
रास्ता रोको आंदोलनामुळे नगर-संभाजीनगर महामार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली. यावेळी पोलिसांनी संभाजीनगरकडे जाणारी वाहने पांढरी पूल व शेवगावमार्गे तसेच सोनई-राहुरीमार्गे वाहतूक वळवली. तर, संभाजीनगरवरून येणारी वाहने नेवासा फाटापासून वळवली. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता.
Tags :
35006
10





