लाडकी बहीण योजना सरकारचा डाव', मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; म्हणाले, "आता लाडकी मेहुणी.."
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी कागदपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयात जावे लागते. उत्पन्नाचा दाखला किंवा महत्त्वाचे कागदपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या आहेत.महसूल कर्मचाऱ्यांचा संपही सुरू आहे. अशात आता सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना आणली. यात सरकारचे दोन डाव दिसतात. एक म्हणजे या योजनेतून मतदान विकत घेण्याचा प्रकार होत आहे आणि दुसरे म्हणजे निवडणूक झाल्यानंतर योजना गुंडाळून टाकायची. आशा कितीतरी योजना आल्या आणि गेल्या”, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आंतरवाली सराटी येथे आजपासून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची सुरूवात केली आहे. याप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते.मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग निवडला आहे. सगेसोयऱ्यांच्या वचनाची पूर्ती करा आणि मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. आता ते आणखी १७ दिवस उपोषण करणार असून त्यानंतर राज्यव्यापी दौरा करणार आहेत. माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले, मी सरकारच्या योजनांचा विरोध करत नाही. पण सरकारने या योजना मधेच आणल्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळण्यात आता अडचणी येत आहेत. सरकारच्या संकेतस्थळावरही लोड आला असून तिथूनही कागदपत्रे डाऊनलोड करण्यात अडचणी येत आहेत.