अवैध वाळू उपसा व वाहतुकीला तातडीने पायबंद घाला
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने मागणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यात सुरु असलेला अवैध वाळू उपसा त्वरीत बंद करावा व शेवगाव तहसीलदार यांचा वाळू माफीयांशी अर्थपूर्ण संबंध असल्याचा आरोप करुन त्यांची चौकशी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.येत्या पंधरा दिवसात वाळू माफियांवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण कर ण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
शेवगाव तालुक्यात महसूल प्रशासनाशी अर्थपूर्ण संबंध ठेऊन वाळूमाफीया प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैध वाळू उपसाचा उच्छाद मांडला आहे. महसूल मंत्री यांच्या आदेशाची शेवगाव तालुक्यात पायमल्ली सुरू आहे. शेवगाव तालुक्यातील मुंगी, आखेगाव, खरडगाव, वरूर, वडुले, बोधेगाव यांच्यासह गोदावरी नदी पात्रता बेसुमार अवैध वाळू उपसा सुरु आहे. यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. अवैध वाळू व्यव साया मुळे रस्त्यांची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. वाळू वाहतूक करणारी वाहने ही रस्त्यावर भरधाव वेगाने जात असल्याने अनेक दुर्घटना घडत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.महसूल प्रशासनाच्या वरदहस्तामुळे वाळू माफियां कडून ठिकठिकाणी वाळूचे साठे करण्यात आले आहे. वाळू टंचाई निर्माण करून जास्त दराने ग्राहकांची आर्थिक लूट केली जात आहे. सायंकाळी सात पासून सकाळी आठ पर्यंत रात्रभर बिनधास्तपणे अवैध वाळू उपसा व वाहतुक सुरू राहत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालून अवैध वाळू उपसा त्वरीत थांबविण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.