महाराष्ट्र
25794
10
जलजीवन'च्या 150 योजनांची कामे बंदच, ठेकेदारांकडून कामे काढून घेण्याचा नगर झेडपीचा इशारा
By Admin
जलजीवन'च्या 150 योजनांची कामे बंदच, ठेकेदारांकडून कामे काढून घेण्याचा नगर झेडपीचा इशारा
तालुकानिहाय सुरू न झालेली कामे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
प्रत्येक कुटुंबाला नळाने शुद्ध पाणी देण्यासाठी हाती घेतलेल्या 'जलजीवन मिशन'च्या 829 योजनांना जिल्हा परिषदेने कार्यारंभ आदेश दिले; परंतु 150 योजनांची कामे अद्यापि सुरू झाली नाहीत.त्यामुळे कामे सुरू न केलेल्या ठेकेदारांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून कामे काढून घेण्याचा इशारा जिल्हा परिषदेने दिला आहे.
अनेक ठिकाणी जागांच्या अडचणी प्रश्न प्रलंबित असल्याने योजना पूर्णत्वाकडे जाताना अडथळ्यांची शर्यत सुरू आहे.
'जलजीवन मिशन'ला 2019मध्ये सुरुवात झाली असली, तरी दोन वर्षे कोरोना संकटात गेल्यामुळे 2022मध्ये या योजनेला गती मिळाली. जिह्यात यापूर्वी अस्तित्वात असलेल्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना, तसेच प्रादेशिक पाणी योजना प्रतिव्यक्ती 40 लिटर निकष ठेवून आखण्यात आल्या होत्या. आता 'जलजीवन मिशन'अंतर्गत जुन्या योजनांची पुनर्बांधणी करताना प्रतिव्यक्ती 55 लिटर पाणी देण्याचा निकष ठेवला आहे. जिल्ह्यातील 931 गावांमध्ये 829 योजनांच्या माध्यमातून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने 'जलजीवन मिशन' डिसेंबर 2023पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तथापि, योजनांच्या कामात अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत.
जलकुंभ उभारण्याच्या जागा, वन विभागाच्या अखत्यारीतील जमिनीची बाधा, पाणी उपलब्धतेसाठीची उद्भवनिश्चिती, राहिलेल्या वाडय़ा-वस्त्यांच्या समावेशासाठी स्थानिक पातळीवरून होत असलेली मागणी अशा अनेक अडचणी कामे सुरू करताना येत आहेत. तसेच एकाच ठेकेदाराकडे अनेक योजनांची कामे आल्याने कामांची गुणवत्ता राखणे आव्हानात्मक ठरणार आहे. जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 7 मार्चपर्यंत कार्यारंभ आदेश देऊनही 150 कामे सुरू होऊ शकली नाहीत. त्यामुळे घेतलेल्या उद्दिष्टाच्या कालावधीतच कामे पूर्ण कशी होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्हा परिषदेने कामाला गती देण्यासाठी संबंधित कामाच्या ठेकेदारांना नोटीस बजावली आहे. कामे सुरू न केल्यास त्यांच्याकडून ही कामे काढून पुढील प्रक्रिया राबविण्याचा इशारा जिल्हा परिषदेने दिला आहे. आतापर्यंत राहाता, संगमनेर येथील प्रत्येकी तीन व श्रीरामपूर येथील दोन कामे पूर्ण झाली आहेत.
तालुकानिहाय सुरू न झालेली कामे
अकोले 20, जामखेड 15, कर्जत 29 कोपरगाव 13, नगर 10, नेवासे 11, पारनेर 14, पाथर्डी 8, राहाता 7, राहुरी 20, संगमनेर 14, शेवगाव 8 श्रीगोंदे 12, श्रीरामपूर 7. 'जलजीवन मिशन'च्या कामाला गती देण्यासाठी बैठका घेऊन सूचना दिल्या जात आहेत. पुढील 15 दिवसांत कामे सुरू न केल्यास संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई केली जाईल. प्रसंगी त्यांचे काम काढून घेतले जाईल. तशा नोटिसा बजाविल्या आहेत.
- आशीष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
Tags :
25794
10





