दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या शिक्षिकेची बदली! नगर जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाचा 'प्रताप'
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या शिक्षिकेची बदली करण्याचा 'प्रताप' नगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने करून दाखविला आहे. नगर जिल्हा शिक्षण विभागाच्या या कारभारावर चोहोबाजूंनी टीका होत आहे.
शेवगाव तालुक्यातील दहीफळ येथील उर्दू शाळेवरील शिक्षिका अफसाना शबीर शेख (रा. झेंडीगेट, नगर) यांचे 12 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. या घटनेला सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना शिक्षण विभागाकडून 6 फेब्रुवारी रोजी पारित झालेल्या शिक्षकांच्या बदली आदेशात या मृत शिक्षिकेची तालुक्यातील दहीफळ येथील उर्दू माध्यमाच्या शाळेतून जामखेड येथील मुलींच्या उर्दू शाळेत बदली झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. या आदेशामुळे नगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अनागोंदीचा कारभार समोर आला आहे.
शिक्षिका शेख यांच्या निधनाबाबत आम्ही शिक्षण विभागातील संबंधितांना यापूर्वीच कळविलेले आहे. आता त्याबाबत अधिक माहिती घेऊन संबंधितांकडे योग्य तो पाठपुरावा करण्यात येणार आहे.
- सय्यद अथर परवेज, प्रभारी मुख्याध्यापक, दहीफळ उर्दू शाळा.