महाराष्ट्र
36891
10
बदलती जीवनशैली ठरतेय हृदय विकाराला कारणीभूत
By Admin
बदलती जीवनशैली ठरतेय हृदय विकाराला कारणीभूत-डॉ.स्वागत ससाणे
आव्हाड महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर उद्घाटन
पाथर्डी प्रतिनिधी:
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांना हृदयविकाराचा धोका वाढत आहे. उच्च रक्तदाबाची समस्या हृदय विकाराला कारणीभूत ठरत असून त्यामुळे अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागत आहे. जोपर्यंत हृदयाचे ठोके आहेत तोपर्यंत आयुष्य आहे, म्हणून प्रत्येक व्यक्तीने हृदयाची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. स्वागत ससाणे यांनी केले.
ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात मेडीलीक्स हॉस्पिटल व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिनानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. ससाणे म्हणाले, दरवर्षी जागतिक हृदय दिनानिमित्त एक विशेष थीम निश्चित केली जाते. या वर्षी जागतिक हृदयदिन २०२३ ची थीम 'प्रत्येक हृदयासाठी हृदय वापरा' अशी ठेवण्यात आली आहे. या थीमद्वारे, लोकांना हृदयविकारांबद्दल जागरुक करणे आणि हा आजार टाळण्यासाठी त्वरित पावले उचलण्यास शिकवणे हा आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर कार्यक्रम आयोजित करून हा दिवस साजरा केला जातो. सध्याच्या युगात वाढत्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेता आपल्याला सावध गिरी बाळगणे गरजेचे आहे. हृदय हे त्यापैकीच एक आहे. त्याचे संरक्षण करण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु निरोगी आहार, मेडीटेशन व व्यायाम, आनंदी जीवनशैली हा सर्वोत्तम मार्ग आहे.
या शिबिरामध्ये मेडीलीक्स हॉस्पिटल पाथर्डी यांच्याकडून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उच्च रक्तदाब, हिमोग्लोबीन, शुगर, ईसीजी आदी तपासणी मोफत करण्यात आली.
शिबीर उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जी. पी. ढाकणे, सुत्रसंचालन डॉ. अशोक कानडे तर आभार शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख यांनी मानले.
Tags :
36891
10





