महाराष्ट्र
54528
10
तायक्वांडो स्पर्धेमध्ये नवजीवन डे स्कूलची दैदिप्यमान कामगिरी
By Admin
तायक्वांडो स्पर्धेमध्ये नवजीवन डे स्कूलची दैदिप्यमान कामगिरी
१४ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी; ५ सुवर्ण, ३ रौप्य व ६ कांस्य पदकांची लयलूट
सिन्नर प्रतिनिधी-सिन्नर येथील श्रीमती पुष्पावती देशमुख नवजीवन डे स्कूल च्या विद्यार्थ्यांनी तायक्वांडो क्रीडा प्रकारात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत जिल्हास्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याला मेहनतीची जोड देत तब्बल ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि ६ कांस्य पदकांची कमाई करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या दमदार कामगिरीमुळे पदकविजेत्या विद्यार्थ्यांनी आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे.
मीनाताई ठाकरे स्टेडियम, नाशिक येथे दि. १७ व १८ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नवजीवन डे स्कूलच्या१४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या खेळातील अचूकता, चपळता, आत्मविश्वास आणि जिद्दीचे दर्शन घडविले.
सुवर्णपदकावर नवजीवनच्या खेळाडूंची मोहोर स्पर्धेत शौर्य सचिन गोबाडे, वेदांत मंगेश वाजे, आयुष महेंद्र पाटील, ईश्वरी निलेश लोणारे आणि स्वरा संदीप लोंढे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि सुवर्णपदक पटकावून नवजीवनच्या यशाची पताका उंचावली. रौप्यपदकाचीही दमदार कमाई
रुद्र संदीप पाचोरे, स्वरा योगेश घुगे आणि श्रेयस मल्हारी मोहाने यांनी आपल्या खेळातील कौशल्य व आत्मविश्वासाच्या जोरावर रौप्यपदकाला गवसणी घातली.
कांस्यपदकावरही नवजीवनच्या खेळाडूंचा ठसा आयन सचिन झगडे, वल्लभ नरेंद्र वाघ, वेदांत गणेश सोनवणे, समृद्धी संदीप काळे, आरोही प्रशांत ताजणे आणि जीविका गणेश गांजवे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले.
या सर्व विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण सराव, कठोर परिश्रम, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले. मैदानावरील प्रत्येक डावात आत्मविश्वास, तंत्रशुद्ध खेळ आणि विजयाची जिद्द दाखवत विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडा कौशल्याची चमक दाखवून दिली.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील तायक्वांडो प्रशिक्षक श्री. भगवान सांगळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन, नियमित सराव आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण यांचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेसोबतच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, संयम, शिस्त, निर्णयक्षमता आणि संघर्ष करण्याची वृत्ती निर्माण करण्यावरही प्रशिक्षणामध्ये भर दिला जात आहे.
“खेळातून व्यक्तिमत्त्व विकास आणि भविष्यासाठी नवी दिशा”
तायक्वांडो हा केवळ आत्मसंरक्षणाचा खेळ नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. नियमित सरावामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक ताकद, आत्मविश्वास आणि शिस्त विकसित होते. तसेच क्रीडा क्षेत्रातील यशामुळे भविष्यात विविध शैक्षणिक व रोजगाराच्या संधींचे दरवाजे खुले होऊ शकतात.
याच उद्देशाने शाळेतील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्राकडे वळावे, नियमित सरावाचे महत्त्व समजून घ्यावे आणि आपल्या सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून द्यावे, यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.यशाबद्दल मान्यवरांकडून कौतुक नवजीवन संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. सुभाष देशमुख (बडे सर), चेअरपर्सन सौ.विजयाताई देशमुख (बडे मॅडम), एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर शिरीन सुभाष देशमुख (दीदी), जॉइंट मॅनेजिंग ट्रस्टी सौ. मंगला पवार तसेच एज्युकेशन ऑफिसर पाटील सर यांनी सर्व पदकविजेत्या विद्यार्थ्यांचे व तायक्वांडो प्रशिक्षक भगवान सांगळे सर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सविता फड तसेच अनिता सूर्यवंशी, योगिता भटजिरे, प्रीती गुजराथी सुमन बिचवे,नरेंद्र वाघ सर व प्रल्हाद देशमुख यांनीही पदकविजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या यशाचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नवजीवन डे स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता विभागीय स्तरावरील स्पर्धेतही नवजीवनचे हे होतकरू खेळाडू आपल्या खेळाची चमक दाखवून शाळेचे, पालकांचे आणि सिन्नरचे नाव उंचावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Tags :
54528
10




