महाराष्ट्र
वाचन प्रेरणा दिन वर्षभर साजरा व्हावा- प्राचार्य डॉ. बबन चौरे
By Admin
वाचन प्रेरणा दिन वर्षभर साजरा व्हावा- प्राचार्य डॉ. बबन चौरे
वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन उपक्रम उद्घाटन
पाथर्डी प्रतिनिधी:
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तक वाचण्याच्या पद्धती बदललेल्या असल्या तरीही आज पुस्तक वाचनाचे महत्व कायम आहे. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने तसेच वाचन संस्कृती रुजविण्यासाठी १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला.आजच्या स्मार्टफोन च्या जगात मुले पुस्तक वाचनाकडे गांभीर्याने पाहत नाहीत, असा आरोप वारंवार केला जातो. परंतु स्मार्टफोनच्या युगातही आम्ही वाचतो हा संदेश विद्यार्थ्यांनी समाजाला देण्याची गरज आज निर्माण झाली आहे, म्हणून वाचन प्रेरणा दिन हा फक्त एक दिवस साजरा न करता तो वर्षभर साजरा व्हावा हीच खरी डॉ. अब्दूल कलाम यांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बबन चौरे यांनी केले.
येथील बाबुजी आव्हाड महविद्यालयात ग्रंथालय व वाचन कट्टा आयोजित वाचन प्रेरणा दिन प्रसंगी सलग ६ तास वाचन उपक्रम उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.व्यासपीठावर ग्रंथपाल डॉ. किरण गुलदगड, वाचन कट्टा समन्वयक डॉ. वैशाली आहेर, डॉ. भगवान सांगळे, प्रा. विजयकुमार म्हस्के, अभिजीत आव्हाड आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. चौरे पुढे म्हणाले, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन स्वत:ला घडविले. देशाच्या संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात त्यांनी केलेले भरीव कार्य सदैव स्मरणात राहील. अभ्यास आणि दर्जेदार वाचनाने माणूस राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचू शकतो याचा वस्तूपाठ म्हणजे अब्दुल कलाम. माणसाला असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे असे ते शेवटी म्हणाले. यावेळी महाविद्यालयाच्या ४६ विद्यार्थ्यांनी सलग ६ तास वाचन उपक्रमात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचनास देऊन त्यावरील परीक्षण घेण्यात आले. पुस्तक वाचतेवेळी एकाही विद्यार्थ्यास स्मार्टफोन हाताळण्यास परवानगी नसल्यामुळे त्यांची एकाग्रता तपासण्यात आली. पुस्तक वाचल्यामुळे ज्ञानात भर पडून मन प्रफुल्लित झाले अशा भावना विद्यार्थांनी उपक्रम संपतेवेळी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ. वैशाली आहेर तर आभार डॉ. किरण गुलदगड यांनी मानले.
Tags :
59383
10