महाराष्ट्र
12619
10
गुटखा,पानमसाला,खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दणका दोन दिवसांत ३२ आरोपी अटकेत
By Admin
गुटखा,पानमसाला,खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दणका दोन दिवसांत ३२ आरोपी अटकेत
अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे आणि सुरक्षित महाराष्ट्र’ या संकल्पनेअंतर्गत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोर, अस्वच्छ अन्न उत्पादक, गुटखा, पानमसाला प्रतिबंधित उत्पादनांची विक्री करणारे आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधातही धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, २९ ते ३१ या तीन दिवसांमध्ये तब्बल १ कोटी ९ लाख ३६ हजार ९२८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच ३२ जणांना अटक केली. यामुळे राज्यातील भेसळखोर आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
एफडीएने ३० व ३१ मे या दोन दिवसांमध्ये मुंबई, कोकण, पुणे, नाशिक व छत्रपती संभाजीनगर, अमरावती या विभागातील प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनाविरोधात केलेल्या कारवाईमध्ये ३२ जणांना अटक केली आहे. तसेच २६ आस्थापनांना सील ठोकून १२ लाख १६ हजार ९६५ रुपयांचा माल जप्त केला आहे. यामध्ये कोकण विभागात सर्वाधिक १६ आस्थापनाविरुद्ध कारवाई करून १६ जणांना अटक केली. त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ आस्थापनांवर कारवाई करून सात जणांना अटक केली. तसेच मुंबईमध्ये एका ठिकाणी कारवाई करून दोन जणांना अटक केली. पुण्यातील तीन ठिकाणी कारवाई करत दोघांना अटक केली. नाशिकमध्ये २ ठिकाणी कारवाई करून दोघांना, तर अमरावतीमध्ये ३ ठिकाणी कारवाई करून तिघांना अटक केली.
अन्नभेसळखोरांनाही दणका
प्रतिबंधित पदार्थांबरोबरच खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात एफडीएने २९ ते ३१ या तीन दिवसांच्या कालावधीत मोहीम राबविली. या मोहीमेमध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, भंडारा, जालना, बीड व नांदेड, परभणी, सोलापूर, छत्रपती सांभाजीनगर, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम या २० जिल्ह्यांमध्ये कमी दर्जा किंवा असुरक्षित अन्नपदार्थ तसेच अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया आणि दिशाभूल करणारे आवरण असणाऱ्या ४७ खाद्यपदार्थांच्या आस्थापनांची तपासणी केली. आंबे, बुंदीलाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, गुळ, खाद्यतेल, तूप, खजूर. आईसक्रिम, कुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाल्याचे पदार्थ, शेंगदाणा चिक्की इत्यादी अन्न पदार्थ तसेच भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाचा सुमारे ९७ लाख १९ हजार ९६३ रुपये किमतीचा ८४ हजार ३३५ किलो इतका अन्न साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
गुळामध्ये साखरेची भेसळ
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात तीन ठिकाणी गुळामध्ये साखरेची भेसळ होत असल्याचे आढळले. या तिन्ही ठिकाणी मिळून सुमारे १० लाख ६६ हजार २४२ रुपये किमतीचा गुळाचा तसेच भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साखरेचा १५ हजार ९६ किलो इतका साठा जप्त करण्यात आला.
आंबे पिकविण्यासाठी घातक पदार्थांचा वापर
नवी मुंबई येथील एपीएमसी बाजारात कृत्रिमरीत्या आंबे पिकविण्यासाठी इथिलीन स्प्रे व संशयित द्रवाचा वापर करण्यात येत असल्याचे आढळून आले. या ठिकाणी सुमारे ११ लाख १२ हजार ८५० रुपये किमतीचे आंबे जप्त करण्यात आले.
Tags :
12619
10




