महाराष्ट्र
55741
10
कांद्याच्या भावात वाढ, अडीच हजारांचा मिळाला भाव
By Admin
कांद्याच्या भावात वाढ, अडीच हजारांचा मिळाला भाव
३८ हजार ७६७ क्विंटल आवक, बांगलादेशात निर्यात खुली झाल्याने भाववाढ
अहिल्यानगर सिटी न्यूज नेटवर्क- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये सोमवारी (८ डिसेंबर) ७० हजार ४८५ कांदा गोण्यांची आवक झाली होतीती. तब्बल एका महिन्यानंतर कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. दरम्यान, बांगलादेशातील निर्यात खुली झाली असल्याने कांद्याच्या भावात सुमारे ५०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. नेप्ती कांदा मार्केटमध्ये लिलाव पद्धतीने झालेल्या खरेदीत लाल कांद्याला प्रतिक्विंटल २१०० ते २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. तर गावरान कांद्याला १७०० ते २१०० रुपये भाव
मिळाला. दरम्यान, मागील एक महिन्यापासून कांद्याच्या भावात चढउतार सुरू होते. परंतु आता कांद्याच्या भावात वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये सोमवारी ३५७१ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. यावेळी एक नंबर लाल कांद्याला प्रतिक्विंटल २१०० ते २५०० रुपये भाव मिळाला. दोन नंबर लाल कांद्याला १५०० ते २१०० रुपये, तीन नंबर कांद्याला ९०० ते १५००, तर चार नंबर
लाल कांद्याला प्रतिक्विंटल ३०० ते ९०० रुपये भाव मिळाला. सोमवारी झालेल्या लिलावात गावरान कांद्यापेक्षा लाल कांद्याला जास्त भाव मिळाल्याचे दिसून आले. सोमवारी ३५ हजार १९५ क्विंटल गावरान कांद्याची आवक झाली होती. यावेळी लिलाव पद्धतीने झालेल्या खरेदीत एक नंबर गावरान कांद्याला प्रतिक्विंटल १७०० ते २१०० रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला १२०० ते १७०० रुपये, तीन नंबर कांद्याला ७०० ते १२०० रुपये, तर चार नंबर कांद्याला ३०० ते ७०० रुपये भाव मिळाला.
६९ लाल कांद्याच्या गोण्यांना ३ हजारांचा भाव
अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केट यार्डात सोमवारी (८ डिसेंबर) ३५२ ट्रक कांद्याची आवक झाली होती. यावेळी अपवादात्मक भाव म्हणून ६९ लाल कांद्याच्या गोण्यांना उच्च प्रतिचा प्रतिक्विंटल ३००० रुपये, तर ८३ लाल कांद्याच्या गोण्यांच्या लॉटला अपवादात्म भाव म्हणून उच्च प्रतिचा २६०० रुपये भाव मिळाला, अशी माहिती अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली.
बांगलादेशातील निर्यात खुली झाल्याचा परिणाम
मागील अनेक दिवसांपासून कांद्याच्या भावात चढउतार सुरू होते. नुकतीच बांगलादेशातील निर्यात खुली झाल्यामुळे कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. गावरान कांद्याला ऊन व थंडीमुळे मोड येणे, काजळी पकडणे याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावरान कांद्याची गुणवत्ता कमी झाली आहे. त्यामुळे गावरान कांद्यापेक्षा लाल कांद्याला चांगला दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी लाल कांदा चांगला वाळवून व प्रतवारी करून आणावा, असे आवाहन अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी केले.
Tags :
55741
10




