कृषि उत्पन्न बाजार समित्या 31 मे पर्यत बंद- जिल्हाधिकारी डाॕ. राजेंद्र भोसले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी -18 मे 2021, मंगळवार
जिल्ह्यात सद्यपरिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून दैनंदिनरित्या रुग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणत वाढ होत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या 18 मे रोजीच्या रात्री 12.00 वाजेपासून ते 31 मे रोजीच्या रात्री 12.00 वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हे आदेश काढले आहेत.
जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारी गर्दी कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोविड 19 ची वाढती रुग्ण संख्येची साखळी तोडण्याकरीता जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याच्या आवश्यकतेबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली व जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या या 31 मे रोजी बंद ठेवण्यासंदर्भात एकमत झाले.
शेतक-यांना त्यांच्या मालाची विक्री करण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था विकेंद्रित पध्दतीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची राहील व समन्वयाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक, यांची राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.