पाथर्डी तालुक्यातील 'या' कोविड केंद्रात चार लहान मुलांची कोरोनावर मात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 12 मे 2021 बुधवार
पाथर्डी शहरातील सुमनताई ढाकणे कोविड केंद्रात तालुक्यातील टाकळी मानूर व तिनखडी येथील दहा वर्ष वयाच्या आतील चार भावंडे व एकाचे पालक येथील केंद्रात कोरोनाची बाधा झाली म्हणून दाखल झाले. लहान मुले असल्याने त्यांना कोणी दाखल करून घेत नव्हते. पालकांच्या विनंतीवरून येथील डॉक्टरांनी लहान मुलांवर उपचाराचे आव्हान स्वीकारले.
आज सकाळी त्यांच्या सर्व चाचण्या नॉर्मल आल्याने, या चौघांचे कुटुंबीय त्यांना नेण्यासाठी आले. आपुलकी आदरातिथ्य व उत्तम सुविधांमुळे मुले आजारी असूनही रमली. डॉक्टरांचे प्रेमळ वागणे , कोविड सेंटर समिती सदस्यांचे सर्वांना चांगल्या प्रकारचे सहकार्य व सर्वच रुग्णांकडून लहान मुलांना जीव लावला गेल्याने रुग्ण कक्षातील वातावरण सतत भावनिक व हलके-फुलके राही. या मुलांना नुकताच निरोप देण्यासाठी सर्व रुग्ण, डॉक्टर, स्वयंसेवक असे सर्वजण टाळ्या वाजवत पुष्पगुच्छ देऊन घोषणा देत कक्षाबाहेर आले. शहरातील कार्यकर्ते योगेश रासने, मुख्य समन्वयक शिवाजी बडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासीर शेख, हुमायून आतार, अक्रम आतार, महादेव आव्हाड, किशोर डांगे, वैभव दहिफळे यासह एम .एम. नि-हाळी विद्यालयाचे स्वयंसेवक शिक्षक उपस्थित होते.