खरवंडी येथे भगवानबाबा कोव्हीड केअर सेंटरचे उद्घाटन
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी येथे भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर व जल क्रांतीचे प्रणेते दत्ता बडे यांच्या अथक प्रयत्नातून भगवान बाबा कोव्हिड केअर सेंटरचे उद्घाटन गुरुवारी भगवान महाविद्यालय, खरवंडी येथे संपन्न झाले.
येळेश्वर संस्थान चे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते या कोव्हिड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
खरवंडी कासार आणि परिसरामध्ये सातत्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेता खरवंडी कासार येथे सेंटर सुरू होणे आवश्यक होते, याचा विचार करून भगवान महाविद्यालय येथे उपलब्ध जागेमध्ये माणिक खेडकर व दत्ता बडे यांच्या संकल्पनेतून कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरसाठी ५० बेडची व्यवस्था प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर यांचे कडून करण्यात आली आहे व रुग्णासाठी वाहनाची व्यवस्थाही त्यांच्याकडून उपलब्ध करण्यात आलेली आहे.
आरोग्य विभाग पाथर्डी तालुका संचलित संत भगवान बाबा कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी दत्ता बडे म्हणाले की, आता परिसरातील कुणीही अंगावर दुखणे काढू नका, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, योग्य वेळी तपासणी करून उपचार घ्या. आम्ही आपणास समवेत आहोत. तसेच भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनीही 'हे कोव्हिड सेंटर कोणत्याही पक्षाचे नाही. सर्व नागरिकांसाठी खुले असून सर्वतोपरी सेंटरला मदत करावी', असे प्रतिपादन केले.
यावेळी खरवंडी कासार चे सरपंच प्रदीप पाटील, भारजवाडीचे सरपंच माणिक बटुळे, येळीचे माजी सरपंच संजय बडे, अशोक खरमाटे, सुरेश केळगंद्रे, वसंत खेडकर, नीलकंठ आव्हाड, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, वंचित बहुजन आघाडीचे दादासाहेब खेडकर, मुंगूसवाडे चे सरपंच प्रविण खेडकर, जवळवाडीचे सरपंच मुरलीधर खाडे, एकनाथवाडीचे सरपंच अशोक खेडकर, ढाकणवाडीच्या सरपंच सुरेखा ढाकणे आदींची उपस्थिती होती.