पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या व्यक्तीने एटीएम कार्डचा पिन मिळवून अनेकांचे एटीएममधून लाखो रुपये काढले
आपल्यालाही होवू शकतो धोका, पेट्रोलपंपावर पिन देवू नका,अन्यथा बॕक बॕलन्स जाण्याची भिती
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 16 मे 2021 , रविवार
नगर : पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणार्या लोकांच्या एटीएम कार्डचे क्लोन करून त्याद्वारे पैसे काढणार्या दोघांना सायबर व भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. सुरज अनिल मिश्रा (वय 23), धीरज अनिल मिश्रा (वय 33 रा. नालासोपारा ता. वसई जि. पालघर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.
अरणगाव (ता. नगर) शिवारातील एका पेट्रोल पंपावर हे दोघे कामगार म्हणून काम करत होते. यांच्या सोबत असलेला तिसरा आरोपी सुजित राजेंद्र सिंग (रा. मुंबई) हा पसार झाला आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन लाख 61 हजार 500 रूपयांची रोख रक्कम, वेगवेगळ्या बँकेचे 31 एटीएम, मोबाईल असा दोन लाख 79 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अरणगाव शिवारातील पेट्रोल पंपावर आरोपी काम करत असताना त्याठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी येणार्या लोकांचे एटीएम कार्ड स्वाईप करत होते. त्यांच्याकडून एटीएमचा पिन विचारून त्याची डायरीमध्ये नोंद करत होते. स्वाईप केलेल्या एटीएम कार्डच्या मदतीने बनावट कार्ड करून व डायरीत नोंद केलेल्या पिनच्या आधारे आरोपींनी नगर शहरातील वेगवेगळ्या एटीएममधून लाखो रूपये काढले आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच भिंगार व सायबर पोलीस पथकाने या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना ठाणे जिल्ह्यातून अटक केली.