पित्याने केला पोटच्या गोळ्याचा खून
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
श्रीरामपूर : मालकाकडून घेतलेली अडीच लाख रुपयांची उचल बुडविण्यासाठी एका पित्याने आपल्या दहा महिन्याच्या चिमुकल्याचा गळा दाबून खून केला. येथील एमआयडीसी मधील खंडाळा शिवारात मोकळ्या जागेत गुरुवारी (२ सप्टेंबर) पहाटे चार वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी श्रावण बाळनाथ आहिरे (वय ४०, रा. हिरेनगर, ता. नांदगाव, जि. नाशिक) याला अटक केली. याप्रकरणी मयत मुलाच्या आईने तक्रार दिली होती.
गुरुवारी रात्री उशिरा येथील शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आपल्या चार मुलासह पती समवेत बुधवारी (१ सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास झोपलेले होते. त्यावेळी पती श्रावण बाळनाथ आहिरे याने मालक संतोष गोराणे यांच्याकडून उचल म्हणून घेतलेले अडीच लाख रुपये बुडविण्यासाठी मुलगा सोपान आहिरे याचा गळा दाबून त्याला ठार मारले.
दरम्यान, अपर पोलिस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर शहर पोलिस पथकासमवेत श्वान पथक, ठसे तज्ज्ञांचे पथक व फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून उत्तरणीय तपासणीसाठी शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतदेहाची उत्तरणीय तपासणी व आरोपीची चौकशी करुन शहर पोलिस ठाण्याच रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी दिली.