साईबाबा मंदिर प्रशासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला निर्णय
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शिर्डी : येत्या ७ ऑक्टोबरपासून श्री.साईबाबा मंदिर सुरू होणार आहे. कोरोना संसर्गाचा अटकाव करण्यासाठी राहाता व शिर्डी मधील महसूल, पोलिस, आरोग्य, बांधकाम, नगरपालिका, रेल्वे, एस.टी, विमानतळ व इतर सर्व शासकीय विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कामकाज करावे आणि कोरोना नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केल्या.
धार्मिकस्थळे सुरू करावयाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची उपविभागीय बैठक साईबाबा संस्थानच्या सभागृहात गुरुवारी संपन्न झाली. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यावेळी बानायत बोलत होत्या. बैठकीला संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब शिंदे, शिर्डी चे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, राहाता पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड, शिर्डीचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील, राहाता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, शिर्डी विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक सुनिल श्रीवास्तव, औद्योगिक सुरक्षा बलाचे उपसमादेशक दिनेश दहिवदकर आदी उपस्थित होते.