महाराष्ट्र
421
10
पाथर्डी,पारनेर,श्रीरामपूर,राहुरी,शेवगाव तालुक्यात संमिश्र प्रतिसाद
By Admin
पाथर्डी,पारनेर,श्रीरामपूर,राहुरी,शेवगाव तालुक्यात संमिश्र प्रतिसाद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला नगर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले. श्रीगोंदे शहरात अर्धा दिवस बंद पाळण्यात आला. तसेच मोटासायकल रॅली काढून निषेध व्यक्त केला. जामखेड शहरासह ग्रामीण भागातील गावांमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.
संगमनेर तालुक्यात महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष व मित्र पक्षांच्या वतीने लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला. संगमनेर शहरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. तळेगाव दिघे येथेही निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेश सरकारचा पुतळा दहन करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी आणला होता, मात्र पोलिसांनी तो ताब्यात घेतला. पारनेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोदी सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. पारनेर तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
पाथर्डी तालुक्यात महविकास आघाडीकडून बंद पाळण्यात आला. केंद्र सरकारचा धिक्कार असो, आरोपींवर कठोर कारवाई करा, मोदी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देऊन पाथर्डी शहरात बंद पाळण्यात आला. दुपारनंतर शहरातील दुकाने खुली झाली. राहाता शहरात बंदला शंभर टक्के व तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. राहाता बाजारतळ येथे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, संभाजी ब्रिगेड तसेच विविध शेतकरी संघटनांच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. भाजपाने या बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले होते. परंतु व्यापाऱ्यांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. राहुरी तालुक्यात बंद पाळण्यात आला. राहुरी बाजार समितीसमोर निषेध सभा घेण्यात आली.
Tags :

