मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाच्या ड्रायव्हरला पारनेरमध्ये लुटले, खासगी कामासाठी सरकारी वाहन
By Admin
मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाच्या ड्रायव्हरला पारनेरमध्ये लुटले, खासगी कामासाठी सरकारी वाहन
अहमदनगर- प्रतिनिधी
नगर-पुणे महामार्गावर सुपेनजीक म्हसणे फाटा येथील टोलनाक्याजवळ असलेल्या गजानन कृपा पेट्रोलियम पेट्रोलपंपावर रात्रीच्या वेळी वाहनात झोपलेल्या सागर मोरे यांच्या वाहनाचा चालक अरूण भोले यास अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (ता. 8 ) पहाटे मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत माहिती अशी की, सागर मोरे यांचे सरकारी वाहनाचा (क्र. एम एच 03 डी ए 7081) चालक अरूण भोले (हल्ल्ली रा. वाशी नाका, चेंबूर, मुंबई, मुळ रा.खांडवी, ता. गेवराई, जि. बीड) हा रविवारी सरकारी वाहनासह त्याच्या गावी बीड येथे गेला होता. तेथून तो आपले काम आटोपून रात्री मुंबईकडे निघाला असताना रात्री खूप उशीर झाल्याने तो नगर- पुणे महामार्गावर म्हसणे फाटा टोलनाक्य़ाजवळ असलेल्या समीर आंबे यांच्या पेट्रोल पंपावर गाडी लावून रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झोपला.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात चोरटे वाहनाजवळ आले. आवाज करून त्यांनी भोले यांना उठविले. त्यांना वाहनातून खाली उतरण्यास सांगितले. काही समजण्याअगोदरच त्यास बेदम मारहाण केली. त्यात भोले जखमी झाले. या वेळी चोरट्यांनी भोले यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची चैन व खिशातील सात हजार दोनशे रूपये काढून घेतले. त्यांनी भोले यांच्याकडून वाहनाची चावी घेऊन पोबारा केला.
याच दिवशी भोले यांना लुटल्यानंतर नगर-पुणे महामार्गावरच सुपे गावाजवळ असलेल्या दौलत पंपाजवळ चोरट्यांनी संजय नानोर (रा. डिग्रस, राहुरी) याच्या पीकअप वाहन चालकास अडवून त्यास मारहाण करीत लुटले. त्याच्याजवळील चार हजार रूपये काढून घेतले.
एक लाख 20 हजार रूपयांची सोन्याची चैन, दोघांकडील मिळून रोख नऊ हजार रूपये लुटल्याची गुन्हा सुपे पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे करीत आहेत.
सरकारी गाडी खासगी कामासाठी
अरूण भोले यांनी मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहायक सागर मोरे यांच्या सरकारी गाडीवर चालक असल्याचे सांगितले आहे. मात्र, असे असेल तर सरकारी गाडी खाजगी कामासाठी थेट मुंबई येथून बीडला कशी गेली असा प्रश्न उपस्थित झाला आहे.