पोलिस बंदोबस्तात होणार वीज बिलांची वसूली ;नगर जिल्ह्यातील"या" मंत्र्यांनीच दिले तसे संकेत
By Admin
पोलिस बंदोबस्तात होणार वीज बिलांची वसूली ;नगर जिल्ह्यातील"या" मंत्र्यांनीच दिले तसे संकेत
नगर- प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना जादा वीज बिल आल्याच्या कारणावरून सध्या संतापाची लाट निर्माण झाली आहे. या विरोधात भाजपाने राज्यभर आंदोलन करून हा विषय आणखीच तापवला आहे.
या परिस्थितीत वीज बिलाच्या वसुलीसाठी जाणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याची शक्यता आहे. असे प्रकार आढळून आल्यास त्यांना पोलिस बंदोबस्त मिळवून दिला जाईल, असे संकेत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले.
नगर शहरातील तेलीखुंट येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना मारहाण झाली. त्या ठिकाणी राज्यमंत्री तनपुरे यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांना धीर दिला. मात्र, हा प्रकार वसुलीच्या वादातून नव्हे तर दुसऱ्याच कारणातून झाल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. रात्रीच्यावेळी एकाने वीज कार्यालयाच्या दरवाजावर लघुशंका केली होती. त्याला कर्मचाऱ्यांनी जाब विचारला असता त्याने वीज कार्यालयात धुमाकूळ घालत कर्मचाऱ्यांना पट्ट्याने मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. यासंबंधी तनपुरे तेथे आले होते.
यावेळी पत्रकारांनी त्यांना वीज बिलाच्या वसुलीतील अडथळ्यांसंबंधी विचारले त्यावर ते म्हणाले, 'हा प्रकार वसुलीच्या वादातून झालेला नाही. मात्र, वीज बिल भरण्यास होणारा विरोध लक्षात घेता वसुलीसाठी जाणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना सुरक्षा आवश्यक असल्याचे दिसून येते.
अद्याप असे प्रकार घडलेले नाहीत. मात्र, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याशी या संभाव्य भितीबद्दल चर्चा केली आहे. हा मुद्दा आपण पोलिस अधीक्षकांकडे उपस्थित करणार असून यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल,' असे सांगत तनपुरे यांनी वीज कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण मिळवून देण्याचे संकेत दिले.
दरम्यान, नगरच्या तेलीखुंट भागातील वीज कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर झालेल्या ह्ल्यासंबंधीही कडक कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यालयाच्या दरवाजावर रात्रीच्यावेळी निखील बाळकृष्ण धंगेकर (रा. तेलीखुंट) याने लघुशंका केली. त्यावेळी वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल शेळके रात्रीपाळीवर होते. त्यांनी यासंबंधी धंगेकर याला जाब विचारला. त्याचा राग येऊन त्याने शेळके यांना पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर काही वेळात चाकू घेऊन आला व पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
ही माहिती कळाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी तेथे आले. तरीही आरोपीचा गोंधळ सुरूच होता. पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करू नये, यासाठीही तो धमकावत होता. वीज कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी धंगेकरविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो एका हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याची, माहिती मिळाली. तनपुरे यांनी या प्रकाराची दखल घेत वीज कार्यालयात धाव घेत तेथील कर्मचाऱ्यांना धीर दिला.