महाराष्ट्र
येळी येथील जगदंबामाता गडावर शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात
By Admin
येळी येथील जगदंबामाता गडावर शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात
विविध पारंपारिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील येळी येथील जगदंबामाता गडावर सोमवार दि. २६ रोजी सकाळी १०:०० वाजता घटस्थापना होऊन शारदीय नवरात्र उत्साहाला सुरुवात करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षाच्या खंडानंतर यावर्षी श्री जगदंबा मातेच्या नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहाच्या वातावरणात, भक्तीभावाच्या वातावरणात हा उत्सव साजरा होत आहे, तेव्हा या कार्यक्रमासाठी येळी व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री जगदंबामाता गड येळी ट्रस्टचे अध्यक्ष संजय बडे व विश्वस्तांनी केले आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी येळी येथील श्री जगदंबा माता मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त श्री ह. भ. प. रामगिरी महाराज, येळेश्वर संस्थान येळी यांचे मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र शनैश्वर देवस्थान बोधेगाव येथील गोपालक ह. भ. प. श्री नंदकिशोरजी महाराज चव्हाण यांच्या अमृतवाणीतून देवी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा, सायंकाळी ६ ते ७ सामुदायिक आरती, रात्री ७ ते ८ फराळ, ८ ते १० देवी भागवत कथा, त्यानंतर १० ते १२ पाथर्डी तालुक्यातील विविध भजनी मंडळचा भजनांचा जागर होणार आहे. सोमवार दि. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२ यादरम्यान हा सोहळा संपन्न होत आहे. अशोक बडे, संदीप गर्जे, अशोक डांगे, विकास डमाळे, संकेत बडे, प्रदीप ढोले, राधाकिसन बडे, विठ्ठल बडे, संजय बडे (सरपंच) हे दररोज जगदंबा माता भक्तासाठी फराळाची सेवा देणार आहेत.
मंगळवार दि. ०४/१० रोजी सकाळी कावडी मिरवणूक, दुपारी होम पूजन, सायंकाळी ६ ते ७ छबिना मिरवणूक व नंतर महाप्रसाद होणार आहे. दि. ०५ रोजी सायंकाळी ४ वाजता दसरा मेळावा व सीमोल्लंघनासाठी जगदंबा माता येथे उपस्थित राहावे. तेव्हा या सर्व कार्यक्रमाचा भावी भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री जगदंबामाता गड येळी ट्रस्टचे अध्यक्ष संजय बडे व सर्व विश्वस्त आणि ग्रामस्थ येळी यांनी केले आहे.
Tags :
71176
10