नगर- औरंगाबाद महामार्गावर अपघात; १ ठार ८ गंभीर
मिरी येथील '१०८' सोनई, जेऊर रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी झाल्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर-औरंगाबाद महामार्गावर खोसपुरी शिवारात शुक्रवार दि. २७ रोजी पहाटे क्रुझर गाडीला झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
खोसपुरी शिवारातील हॉटेल संग्राम पॅलेस समोर उभ्या असलेल्या ट्रकला (क्र. एम. एच. १४ एच.यु. ०२२७) नगर कडून औरंगाबाद कडे निघालेल्या क्रुझर गाडीने (क्र. एम. एच.१६ ए.टी.१४०६) भरधाव वेगात पाठीमागून जोराची धडक दिली. हा अपघात पहाटे चारच्या सुमारास घडला.
अपघातात शांताराम लक्षमण घन (वय ४० रा. घनवाडा ता. सोयगाव जिल्हा औरंगाबाद ) हा जागीच ठार झाला, तर श्रद्धा कैलास पवार (वय ३०), विकी नाना पाटील (वय २७), नंदा शांताराम घन (वय ३२),वेदांत शांताराम घन ( वय १४), खुशी शांताराम घन (वय ११), राजपाल अशोक पवार (वय १५), राजगुरू कैलास पवार ( वय २२), कैलास अर्जुन पवार ( सर्व रा. जामनेर तालुका जामनेर) हे जखमी झाले आहेत. जखमी मधील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. जखमींवर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती समजताच सोनई, जेऊर, जिल्हा रुग्णालय व मिरी येथील चार '१०८' रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. यावेळी १०८ रुग्णवाहिका चालक हर्षल तोडमल, भाऊसाहेब बंगे, डॉ. सचिन कोरडे यांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मोठी मदत केली. १०८ रुग्णवाहिका एक प्रकारे जखमीं साठी जीवनदायिनी ठरल्या आहेत. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.