दोन मोटरसायकलचा भीषण अपघात; मुलगी टँकरखाली आल्याने जागीच ठार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरानजीक एक भयंकर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे.
दोन मोटरसायकलच्या अपघातात मोटरसायकलवरील मुलगी मळीच्या टँकरखाली चिरडून ठार झाली. तर वडिलांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. मुलगा अत्यवस्थ असून त्याला नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
हा अपघात सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गायकवाड वस्ती येथे घडला. या भीषण अपघातात मोटारसायकलवरून जाणारे नायगाव येथील बाळासाहेब जगन्नाथ गायकवाड (वय ४५ वर्षे), अजित गायकवाड (वय २० वर्षे ), दीपाली गायकवाड (वय १८ वर्षे) हे तिघे पढेगावकडे जात असताना दोन मोटारसायकलच्या धडकेत मुलगी दिपाली मोटारसायकलवरुन खाली पडून बेलापूरकडे जाणा-या एमएच 43 यु 3335 या क्र मळीच्या टँकरखाली येवून जागीच ठार झाली.
यात वडील आणि मुलगा अजित गंभीर जखमी झाले असून यांना श्रीरामपूरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वडिलांचा मॄत्यू झाला. तर मुलगा अजित प्राथमिक उपचार करुन त्यास पुढील उपचारासाठी नगर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मळीचा टँकर व मोटारसायकल पोलीस ठाण्यात आणली आहे .
शेतमजुरीवर होता कुटुंबाचा चरितार्थ
बाळासाहेब गायकवाड हे शेतमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवीत होते. अजितही एका खासगी कंपनीत काम करीत होता. दीपाली येथील बोरावके महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. त्यांच्या तीन मुलींचा विवाह झाला आहे.