महाराष्ट्र
विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक, ग्रामस्थांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
By Admin
विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक, ग्रामस्थांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाचवीतील विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱया दोनजणांना ग्रामस्थांनी बेदम चोप देत श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज येथे बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे.
या दोघांवर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
समर्थ गणेश यादव (वय 11) असे या बालकाचे नाव असून, नासीर गुलाब पठाण (वय 28, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) व हरिभाऊ दत्तू वाळूंज (वय 27, रा. पिंपळगाव तुर्क, ता. पारनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. समर्थचे वडील गणेश विठ्ठल यादव यांनी फिर्याद दिली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज (आनंदवाडी) येथील समर्थ यादव हा रयत शिक्षण संस्थेच्या काष्टी येथील जनता विद्यालयात इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. बुधवारी सकाळी चित्रकला स्पर्धा असल्याने शाळा लवकर सुटली होती. त्यानंतर त्याने काष्टी येथील यशोदा क्लासमध्ये 1 तास पूर्ण केला व घरी जाण्यासाठी अजनुज चौकात येऊन थांबला असता, तेथे विनाक्रमांकाची एक गाडी आली. गाडीतील दोघांनी 'आम्ही तुझ्या पप्पाचे मित्र आहोत, तुला कुठे जायचे आहे, तिकडे सोडतो' असे सांगून समर्थला गाडीत बसविले. काही अंतरावर आणखी दोन अनोळखी लोकांना गाडीत बसवून त्यांना गणेशा व माळवाडी येथे सोडले. समर्थला पुढे घेऊन जात असताना खरातवाडी
येथे हरिभाऊ वाळुंज याने चाकू दाखवून 'आरडाओरडा केला, तर चाकू पोटात खुपसेन' असा दम दिला. दरम्यान, रस्त्यात मोठा खड्डा आल्याने गाडीचा वेग कमी झाल्याची संधी साधत समर्थने चालत्या गाडीतून उडी मारून रस्त्यालगत असलेल्या अशोक वाघमोडे यांच्या घरी गेला. तेथून त्याने वडिलांना फोन करून घडलेली हकिकत सांगितली. समर्थच्या वडिलांनी त्यांचे आनंदवाडी येथील मित्र महेंद्र गिरमकर यांना संबंधित गाडीबाबत माहिती दिली.
काष्टी-सिद्धटेक रोडवरील आनंदवाडी फाटा येथे महेंद्र गिरमकर व त्यांच्या दहा ते पंधरा सहकाऱयांनी गाडी अडवून चौकशी केली असता, गाडीत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गाडीत चाकू, दारूच्या बाटल्या व आठ ते दहा वेगवेगळ्या क्रमांकांच्या नंबर प्लेट व महाराष्ट्र शासन नाव असलेल्या पाटय़ा मिळून आल्या. ग्रामस्थांनी दोघांनाही बेदम चोप देत श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी पकडल्याची चर्चा श्रीगोंदा शहरासह तालुक्यात वाऱयासारखी पसरली. यामुळे श्रीगोंदा पोलीस स्टेशनला प्रचंड गर्दी झाली होती. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल
करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग तपास करीत आहेत.
Tags :
57171
10