राम मंदिर निर्माणासाठी दीड महिन्यात जमला 1000 कोटींचा निधी
प्रतिनिधी - नगर citizen
अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने देशभरात राबवण्यात आलेल्या देणगी मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सध्या सुमारे 1000 कोटी रुपयांचा निधी ट्रस्टकडे जमा झाला आहे, अशी माहिती ट्रस्टचे एक विश्वस्त आणि कर्नाटकातील उडुपी येथील पेजावर मठाचे मठाधिपती श्री विश्वप्रसन्न तीर्थ महाराज यांनी दिली.
राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या सहकार्याने या ट्रस्टचे काम चालते. 15 जानेवारीपासून या ट्रस्टने देशभरात देणगी मोहिमेला प्रारंभ केला.
याद्वारे आतापर्यंत केवळ दीड महिन्यातच ट्रस्टकडे 1000 कोटी रुपयांचा निधी जमा झाला.
विश्वस्त विश्वप्रसन्न महाराज म्हणाले, 'दक्षिण हिंदुस्थानातील जनतेने देणगी मोहिमेला दिलेल्या प्रतिसादामुळे मी खूपच आनंदी आहे. समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी या प्रकल्पासाठी मदत दिली आहे. निधीमध्ये वाढ होणे ही मंदिर निर्माणासाठी काम करणाऱ्या संपूर्ण हिंदू समाजासाठी महत्त्वाची बाब आहे. अयोध्येत मंदिर उभारायचे आणि त्यात प्रभू रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची एवढाच ट्रस्टचा उद्देश नाही, तर पुढे जाऊन रामराज्य म्हणजे आदर्श कल्याणकारी राज्य प्रस्थापित करण्याचे या प्रकल्पाचे अंतिम उद्दिष्ट आहे, असे विश्वप्रसन्न महाराज यांनी सांगितले. राज्यातील सर्व मंदिरे संरक्षित करावीत. कारण यामुळे मंदिरांच्या जागांवर अतिक्रमण करण्याचा कोणी विचार करणार नाही आणि त्यामुळे भविष्यात वाद होणार नाहीत, असेही विश्वप्रसन्न महाराज यांनी म्हटले आहे.