वीर जवानास सेवेत असताना वीरगती; घटनेच्या धक्क्याने आजीनेही सोडला प्राण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील जवानास सेवेत असताना नारंगी मिल्ट्री स्टेशन (आसाम) येथे वीरगती प्राप्त झाली आहे.
या घटनेच्या धक्क्याने गुरूवारी (दि.18) त्यांच्या आजीनेही प्राण सोडला. या हृदयद्रावक घटनेने गावात शोककळा पसरली आहे. राक्षी येथील रहिवाशी मेजर सचिन रामकिसन साळवे (वय 30) यांना नारंगी मिल्ट्री स्टेशन 17 बटालीयन तुकडी आसाम येथे सेवेवर असताना बुधवारी (दि. 17) रोजी वीरगती प्राप्त झाली. या घटनेचे वृत्ताने गावात एकच शोककळा पसरली. तर, ही माहिती समजताच मेजर सचिन यांच्या आईकडील नात्याच्या आजी गंगुबाई सुखदेव जगधने (वय 70, रा.राक्षी) यांना हा धक्का सहन न झाल्याने, त्यांनी गुरूवारी (दि.18) आपला प्राण सोडला.
त्याचबरोबर शहीद सचिन यांचे लष्करी सेवेत असणारे बंधू मेजर प्रवीण साळवे हे सुट्टीवर गावी होते. मात्र, सुट्टी संपल्याने ते सेवेवर रुजू होण्यासाठी जात असताना त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनाही मोठा धक्का बसल्याने त्यांच्यावर शेवगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहीद सचिन साळवे हे 2011 मध्ये लष्करात भरती झाले होते. तर, त्यांचे बंधूही याच वेळी लष्करात भरती झाले होते. साळवे यांचे पार्थिव आज (दि.19) रोजी पहाटे विमानाने पुणे येथे येणार आहे. तेथून सकाळी 9 वाजेपर्यंत राक्षी येथे आल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.