मुंगीच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला करत जबर मारहाण
By Admin
मुंगीच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला करत जबर मारहाण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अनधिकृत नळ कनेक्शन नियमीत करुन घेण्यासाठी समजावून सांगण्यास गेलेल्या मुंगी येथील सरपंचास कोयत्याने मारहाण करुन जबर जखमी केल्याची खळबळजनक घटना मुंगी येथे काल मंगळवार ता.
१९ रोजी घडली. हल्यात सरपंच दादासाहेब भुसारी हे जबर जखमी झाले असून, त्यांच्यावर शेवगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जिल्हा तसेच शेवगाव सरपंच परिषद, ग्रामसेवक संघटना, कर्मचारी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. भुसारी यानी दिलेल्या फिर्यादीवरुन प्रमोद पंढरीनाथ गायकवाड राहणार मुंगी ता. शेवगाव याच्या विरोधात पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सरंपचावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करुन आरोपीला त्वरीत अटक करावी अशी मागणी सरपंच परीषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे सह शेवगाव शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, सरपंच भुसारी, ग्रामसेवक सुनिल काळे, क्लार्क सुरेश जोरे व शिपाई नवनाथ वाल्हेकर हे गावातील खोदलेला रस्ता व प्रमोद गायकवाड याने अनाधिकृत घेतलेले नळ कनेक्शन बघण्यासाठी गेले होते. ते पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयाकडे येत असतांना धनगर गल्लीतील भाऊसाहेब दसपुते यांच्या घराजवळ ग्रामसेवक काळे व क्लार्क जोरे यांची दुचाकी गायकवाड याने अडवून त्यांना शिवीगाळ केली. सरपंच भुसारी व नवनाथ वाल्हेकर हे वाद मिटवत असतांना प्रमोद गायकवाड याने लपवून ठेवलेला कोयता काढून सरपंच भुसारी यांच्या डोक्यात मारुन त्यांना जबर जखमी केले.
त्यानंतर सरपंच भुसारी यांना शेवगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गायकवाड याच्या विरुध्द जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे व पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची माहिती घेतली.
दरम्यान, सरपंचावर झालेल्या खुनी हल्ल्याचा निषेध करीत या घटनेतील आरोपीला त्वरीत अटक करावी. अशी मागणी सरपंच परीषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्यासह शेवगाव शाखेच्या वतीने सरपंच बाळासाहेब आव्हाड, शरद सोनवणे, गोकुळ भागवत, बाळासाहेब गोर्डे, प्रल्हाद देशमुख, गोकुळ व्यवहारे, महेश काळे, संजय खेडकर, दिलीप सुपारे, विकास भागवत आदीनी सपोनि रविंद्र बागुल यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.