इगतपुरी तालुक्यातील 'या' गावात नरभक्षक बिबट्या? वृद्ध महिलेची शिकार केल्याचे उघड
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शकुंतला अमृता रेरे असे हा महिलेचे नाव आहे. चिंचलेखैरे या गावात गट नंबर २०५ येथे ही महिला झोपडीमध्ये राहते. शनिवारी रात्री ही महिला झोपेत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. या महिलेला बिबट्याने तब्बल ५०० मीटर अतंरावर ओढत नेले. हिंस्त्र असलेल्या या बिबट्याने या महिलेचा छातीपासून डोक्यापर्यंतचा पूर्ण भाग खाल्ला असल्याची बाब निदर्शनास आली आहे. इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये या महिलेच्या मृतदेहाचे शविच्छेदन करण्यात आले. त्यात हे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांच्यासह वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. तसेच, रेरे कुटुंबाला सरकारी नियमाप्रमाणे आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाच्यावतीने सर्व प्रयत्न केले जातील, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
इगतपुरी तालुक्यात एक बिबट्या नरभक्षक बनला आहे की काय असा मोठा संशय निर्माण झाला आहे. तालुक्यातील चिंचलेखैरे येथे बिबट्याने ५५ वर्षीय महिलेवर हल्ला केला.
दरम्यान, या घटनेमुळे गावाच्या परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.