महाराष्ट्र
पाथर्डीच्या आरती केदारची महिला आयपीएल ला गवसणी
By Admin
पाथर्डीच्या आरती केदारची महिला आयपीएल ला गवसणी
पाथर्डी- प्रतिनिधी
सुमारे पाच सहा वर्षांपूर्वी सर्वप्रथम पाथर्डीची आणि एस. व्ही. नेटची खेळाडू आरती बुऱ्हाडे हिने राज्य पातळीवर केलेल्या कामगिरीने समस्त क्रीडाक्षेत्रातील दिगगजांच्या नजरा पाथर्डीकडे वळल्या. त्यानंतर पाथर्डी ही महिला क्रिकेटपटूची खाण आहे की काय? असा प्रश्न पडत आहे.
त्याला कारण म्हणजे, पाथर्डीच्याच अनुक्रमे,ज्ञानेश्वरी वाघ, आरती केदार आणि अंबिका वाटाडे या तिघींच्या नावाचा महिला राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धामध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरीने गवगवा होत आहे. ही बाब, समस्त पाथर्डीकर, जिल्हावासीय आणि महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची आहे.
खरंतर आपल्याकडे मुली आणि क्रिकेट हे समीकरण अजूनही फारसे पचनी पडत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या शेतकरी पालकांनी दिलेली धाडसी मोकळीक ही अभिनंदनीय आहे.
मुळात अशा गुणवान खेळाडूंना मैदानाबरोबरच उत्तम मार्गदर्शनाची जोड मिळावी लागते.
या दोघींचे नशीब अनुकूल असल्याने एम. एम. निऱ्हाळी विद्यालयाचे भव्य मैदान आणि क्रिकेटचे हाडाचे खेळाडू आणि प्रशिक्षक शशिकांत निऱ्हाळी यांचे मार्गदर्शन लाभले.
शालेय पातळीवर क्रिकेट हे वेळखाऊ आणि खर्चिक खेळ असल्याने संस्थेचा दृष्टिकोन नेहमीच उदासीन असतो.
पण संस्था चालक प्रतापकाका ढाकणे हे स्वतः खिलाडुवृत्ती जोपासत असल्याने त्यांनी शालेय मैदान या ध्येयवेड्या प्रशिक्षकला आणि शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना बहाल केले. तसेच संस्थेचे प्राचार्य व सर्व सेवकवृंदाची नेहमीच साथ या प्रशिक्षणवर्गाला मिळत आहे.
या भौतिक सुविधाबरोबरच खेळासाठी आवश्यक असलेल्या महागड्या साहित्यासाठी बाळासाहेब गोल्हार, उद्योजक गणेश शिरसाट तसेच सुरेश कोटकर या ज्ञात तसेच अज्ञात सामाजिक सेवेचे व्रत हाती घेतलेल्या उदार व्यक्तिमत्वाच्या दात्यांनी सढळ हातांनी नेहमीच मदत केली.
अशा या पार्श्वभूमीवर तालुक्यातील हातराळ, बाभळगाव,शिरसाटवाडी यांसारख्या खेड्यातून रोज सायकलवर ये जा करून या मुलींनी शाळेव्यतिरिक्त मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग करून कठोर मेहनतीने हे यश आज संपादन केले आहे. घरच्या मैदानावरची कामगिरीचा आलेख राज्यातील आणि देशातील मैदानावरसुद्धा वाढत गेला आहे. यामागची त्यांची तपस्या राष्ट्रीय पातळीवरील महिला आयपील स्पर्धेसाठी व्होलोसिटी संघात निवड होऊन आज खऱ्या अर्थाने पूर्णत्वास आली आहे.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना होताना आरती केदारने या एम. एम. निऱ्हाळी विद्यालयाच्या मैदानावर डोके ठेवून केलेला नमस्कार अतिशय बोलका होता. या मैदानाचे प्रेम आणि त्यावरील भक्तीचे ऋणानुबंध ती कदापीही विसरू शकत नाही. हा दंडवत हे त्याचे द्योतकच आहे.
प्रतापकाकांनी आरती केदारला दिलेले पंचवीस हजाराचे पारितोषिक हे तिला निश्चितच बळ देणारे ठरणार आहेच. पण अशा गुणवान आणि नवोदित मुलामुलींसाठी समाजातल्या दानशूर व्यक्तींनीही पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे. अकॅडमी चालवण्यात आर्थिक संघर्ष हा नित्याचाच असतो पण शशिकांत निऱ्हाळी यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे त्यांच्या या अकॅडमी ला भरीव मदत मिळाली तर भविष्यातही एस. व्ही. नेटचे गुणवान खेळाडू सातत्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील असा विश्वास वाटतो आहे.
या तीनही खेळाडूंनी पाथर्डीचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशात उंचावले आहे.
या खेळाडूंच्या उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
उल्हास पाखरे
Tags :
193
10