पाथर्डी- परीक्षेसाठी खोटी ओळखपत्र सादर करीत डमी नावाने परीक्षा केंद्रात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कर सहाय्यक पदासाठी कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी खोटी ओळखपत्र सादर करीत डमी नावाने परीक्षा केंद्रात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या दोन संशयितांची सबळ पुराव्या अभावी मुख्य न्याय दंडाधिकारी ए एम फडतरे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
संशयितांच्या वतीने वकील अमोल सामंत, संग्राम देसाई, अशपाक शेख यांनी काम पाहिले.
२८ ऑगस्ट २०१६ रोजी कुडाळ हायस्कूल परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला होता. याबाबत तत्कालीन कुडाळ नायब तहसीलदार नंदकुमार दत्तात्रय तारी (वय ५४) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भादवी कलम ४१९, ४६५, ४६८, ४७१ आणि महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ इतर विशिष्ठ परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध अधिनियम १८८२ चे कलम ७ व ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२८ ऑगस्ट २०१६ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कर सहाय्यक ही परीक्षा जाहीर झाली होती. यासाठी कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज हे परीक्षा केंद्र होते. या केंद्रावर परमेश्वर उद्धव आंधळे ( वय २८) रा. जिरेवाडी ता. पाथर्डी जिल्हा अहमदनगर हे मुख्य परीक्षार्थी होते. मात्र, त्यांनी स्वतः परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित न राहता अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शेगाव शिंगोरी येथील भगवान भगवंत चेमटे यांना परमेश्वर उत्तम अंधारे या बनावट नावाने ओळखपत्र तयार करून त्यांना परीक्षा केंद्रावर पाठविले होते. ओळखपत्राची तपासणी करताना ही बाब उघड झाली होती. त्यामुळे तत्कालीन नायब तहसीलदार नंदकुमार तारी यांनी या दोघां विरोधात पोलिसांत तक्रार
दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्याय दंडाधिकारी ए एम फडतरे यांच्या न्यायालयात पूर्ण झाली असून सबळ पुराव्या अभावी या दोघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे..