पाथर्डी : अवैध वाहतूक कोळसा ट्रक, 'या' गावातील चालक ताब्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी - वन विभागाच्या पथकाने सापळा लावून अवैध कोळसा वाहतूक करणार्या ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले. सुमारे 200 गोण्या कोळसा वनविभागाने जप्त केला असून याचे वजन सहा ते सात टन आहे.
वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पाथर्डी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांना अवैध पद्धतीने कोळशाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर वनविभगाचे वनपाल रामदास शिरसाट, विजय पालवे, राजेंद्र आल्हाट, अप्पासाहेब घनवट, पांडुरंग हंडाळ, नारायण दराडे, एम. एन. पठाण आदींच्या पथकाने शेवगाव तालुक्यातील वडुले फाट्यावर शेवगाव -मिरी रस्त्यावर ही कारवाई करून आत बिना परवाना वन उपजाची अवैध वाहतूक केल्याचे प्राथमिक निष्पन्न झाले.
त्यांनतर कोळसा व ट्रक जप्त करून संशयित आरोपी ट्रकचालक सीताराम शिंदे रा. मांडवा, ता. पाथर्डी याला वन विभागाने ताब्यात घेतले आहे. भारतीय वन अधिनियमान्वये कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी व शेवगाव या दोन्हीं तालुक्यांचा वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांनी गेल्या दीड महिन्यांपासून त्यांनी आपल्या पदाचा पदभार घेतल्यापासून कारवाईचा धडाका लावत अकरा कारवाया करून यात ट्रक, जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रक व लाकूड कापण्याच्या गिरणीचे मशीन असा एकूण सुमारे एक कोटींचा मुद्धेमाल जप्त करून काही दंडात्मक कारवाई केल्याने शासनाच्या तिजोरीत मोठा महसूल गोळा केला आहे. अशा धडाकेबाज कारवाईमुळे वन विभागाच्या राखीव जागेतून अवैध वृक्षतोड, मुरूम चोरी व जंगली प्राण्यांची हत्या करणार्या लोकांवर वन विभागाचा धाक वाढला आहे.