बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश, मुला-मुलीच्या आई-वडिलांसह सातजणांवर गुन्हा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणाऱया मुलीच्या व मुलाच्या आई-वडिलांसह मुलावर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वांबोरी येथे 20 मे रोजी 16 वर्षे 7 महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला. आपली मुलगी अल्पवयीन आहे, हे माहिती असूनही तिच्या आई-वडिलांनी तिचा विवाह राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर लावून दिला. याबाबत राहुरी पोलिसांना खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीररित्या विवाह लावून देणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन कारवाई केली.
पोलीस नाईक आजिनाथ पालवे यांच्या फिर्यादीवरून मुलीचे वडील, मुलीची आई मुलगा विवेक जयानंद लोंढे, मुलाची आई निता जयानंद लोंढे (रा. घाटकोपर, मुंबई), मुलाचे मामा मंगेश सुखदेव केदार (रा. भाळवणी, ता. पारनेर) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक सुशांत दिवटे तपास करीत आहेत.