पंकजा मुंडेचा २१ जून पासून महाराष्ट्र दौरा
मोहटादेवीचे दर्शन घेऊन महाराष्ट्र दौऱ्यात कार्यकर्त्यांशी संवाद
पाथर्डी- प्रतिनिधी
भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवीच्या दर्शनासाठी २१ जून रोजी येणार आहेत आणि त्या महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर यांनी दिली.
मोहटा देवीच्या दर्शनानंतर मुंडे ह्या पाथर्डीतील भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच त्या मुकुंद गर्जे या कार्यकर्त्याचीही भेट घेणार आहेत. पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर मुकुंद गर्जे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता पंकजा मुंडे त्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचे तिकीट न मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करून संताप व्यक्त केला होता. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी कोणत्याही माध्यमाशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, परंतु अचानक महाराष्ट्र दौरा काढल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याकडे लागले आहे.
पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यामुळे भाजपच्या मुंडे गटाला माणनाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य व उत्साह निर्माण झाला आहे. मुंडे या कार्यकर्ते व जनतेशी संवाद साधणार आहेत. पंकजा मुंडे यांना ओबीसी चेहरा म्हणून लोकांची पसंती आहे व वेळोवेळी पंकजा मुंडे यांनी ओबीसी प्रश्नावर आवाज उठवला आहे. पंकजा मुंडे या दौऱ्यावर काय बोलतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.