महाराष्ट्र
मुलाचे अपहरण करणारा २४ तासांमध्ये जेरबंद
By Admin
मुलाचे अपहरण करणारा २४ तासांमध्ये जेरबंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सोलापूर रस्त्यावरील केदारी वस्ती परिसरातून अपहरण झालेल्या आठ वर्षांच्या मुलाचा २४ तासांत शोध घेऊन त्याला सुखरूप नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली.
नागेश चंद्रभान भिंगारदिवे (वय ३५, रा. दरेवाडी, ता. नगर) याला याप्रकरणी अटक करण्यात आली.
अहमदनगर- सोलापूर रस्त्यावरील केदारे वस्तीतून एका आठ वर्षीय मुलाचे रविवारी (ता. ८) दुपारी दोनच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी त्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ तपासाची चक्रे फिरविली. शहरातील स्टेट बँक चौकातून अपहरण करणारा संशयित नागेश चंद्रभान भिंगारदिवे याला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली.
पोलिस कारवाईच्या भीतीने त्याने या मुलाला रेल्वेस्थानकावरून एका रेल्वेमध्ये बसवून दिल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. पुणे रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही पुण्याला रवाना झाले. सोमवारी सकाळी या पथकाने पुणे रेल्वेस्थानकावरून अपहृत मुलाला ताब्यात घेतले. सायंकाळी पाचच्या सुमारास त्याला नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, दिनेश मोरे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, विशाल दळवी, दीपक शिंदे, रवी सोनटक्के, रोहित येमूल, चंद्रकांत कुसळकर आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
Tags :
28308
10