महाराष्ट्र
इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक येणार; डिझेलसाठी पर्याय
By Admin
इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक येणार; डिझेलसाठी पर्याय
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रकबाबत केंद्रीय परिवहन मंत्री यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. तसेच आपण लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric tractor) आणि ट्रक (Truck) लॉन्च करणार असल्याचं त्यांनी पुण्यात बोलताना म्हटलं आहे.
परंतु त्यांच्या घोषणेवरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरूवात केली आहे. परंतु याआधी वीजेचा (Electric) प्रश्न सोडवा त्यानंतर घोषणा करा, असा सल्ला सुद्धा त्यांना अनेकांनी दिला आहे.
पेट्रोल-डिझेलचा पर्याय म्हणून इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाच्या वापरावर भर देत बांधकाम आणि कृषी उपकरणांमध्ये इथेनॉल वापरण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय साखर परिषद 2022 मध्ये नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ''इथेनॉल आणि मिथेनॉलसारख्या पर्यायी इंधनांसोबतच इलेक्ट्रिक हे भविष्य आहे. मला आठवतं, 3 वर्षांपूर्वी मी जेव्हा ई-वाहनांबद्दल बोलायचो तेव्हा लोक मला प्रश्न विचारायचे. पण आता बघा, ई-वाहनांना खूप मागणी आहे, लोक वाट पाहत आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बसेसनंतर आता मी लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक लाँच करणार आहे.''
गडकरी पुढे म्हणाले की, ''बजाज, टीव्हीएस आणि हिरोने फ्लेक्स इंजिन मोटरसायकल आणि ऑटो आणल्या आहेत. मी पंतप्रधानांकडे गेलो आणि पुण्यात इंडियन ऑइलचे 3 इथेनॉल पंप घेतले. मात्र आजपर्यंत येथे एक थेंबही विकला गेला नाही, त्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती करावीशी वाटते की, आपण एकत्र या आणि बजाज यांच्यासोबत बैठक बोलवा. पुण्यात 100% इथेनॉलवर स्कूटर-ऑटो लॉन्च करण्यासाठी आम्ही बजाजशी बोलू. इथून सुरुवात करूया. त्यामुळे प्रदूषणही कमी होईल. शेतकऱ्यांना थेट इंधनाची विक्री करण्यासाठी पुण्यात इथेनॉल पंप उभारा.''
नितीन गडकरी म्हणाले की, ऊर्जा आणि उर्जा क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यासाठी देश 10 लाख कोटी रुपयांच्या पेट्रोलियम उत्पादनांची आयात करतो आणि पुढील पाच वर्षांत ही मागणी 25 लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. ते म्हणाले की, डिझेलवर आधारित शेती उपकरणे पेट्रोलवर आधारित केली पाहिजेत आणि फ्लेक्स इंजिनचे रूपांतर इथेनॉलवर चालवता येईल.
Tags :
1052
10