जिल्हा बॕक निवडणूक - कर्डिलेंच्या निकालाकडे लक्ष :बॅंकेसाठी मतदान शांततेत
By Admin
जिल्हा बॕक निवडणूक- कर्डिलेंच्या निकालाकडे लक्ष : बॅंकेसाठी मतदान शांततेत
अहमदनगर- प्रतिनिधी
जिल्हा सहकारी बॅंकेच्या 21पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित चार जागांसाठी आज मतदान शांततेत झाले. त्यात बिगरशेती मतदारसंघासाठी 97.46 टक्के, सेवा संस्था मतदारसंघासाठी कर्जतमध्ये 98.65, तर नगर व पारनेरला 100 टक्के मतदान झाले. उद्या (रविवारी) सकाळी 11 च्या दरम्यान निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले हे उमेदवार रिंगणात असल्याने त्यांच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील 14 केंद्रांवर शांततेत मतदान झाले. त्यात सेवा संस्था मतदारसंघासाठी कर्जतमध्ये 74 पैकी 73, नगरमध्ये पूर्ण 109 व पारनेरमध्ये सर्व 105 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
बिगरशेती मतदारसंघात 1376 पैकी 1341 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानास आज सकाळी आठला सुरवात झाली. दुपारी 12 वाजता चारही जागांसाठी 64.52 टक्के मतदान झाले होते. मात्र, त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत सेवा संस्था मतदारसंघासाठी नगरमध्ये 100 टक्के, तर बिगरशेती मतदारसंघासाठी अकोले, पाथर्डीत 100 टक्के मतदान झाले. मतदानप्रकियेदरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या नियोजनामुळे मतदानप्रक्रिया निर्विघ्न पार पडली.
बिगरशेती मतदारसंघासाठी तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी
अकोले - 100, जामखेड - 95.83, कर्जत - 100, कोपरगाव - 95.78, नगर - 97.75, नेवासे - 97.65, पारनेर - 98.73, पाथर्डी - 100, राहाता - 94.24, राहुरी - 98.04, संगमनेर - 98.70, शेवगाव - 100, श्रीगोंदे - 95.65, श्रीरामपूर - 96.77.
100 टक्के मतदान
बिगरशेती मतदारसंघासाठी अकोले, कर्जत, पाथर्डी व संगमनेर मतदान केंद्रांवर 100 टक्के मतदान झाले. सेवा संस्था मतदारसंघात पारनेर व नगर मतदारसंघांत 100 टक्के मतदान झाले.
नगरमध्ये आज मतमोजणी
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सभागृहात उद्या (रविवारी) सकाळी नऊ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. त्यासाठी एकूण सात टेबल असून, 20 अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. चारही जागांचे निकाल दोन तासांत हाती येण्याची शक्यता आहे.
नेवाशात 83 जणांचे मतदान
बिगरशेती मतदारसंघासाठी नेवाशात 85 पैकी 83 जणांनी मतदान केले. एक मतदार मृत असून, एकाने मतदानाकडे पाठ फिरविली. जलसंधारणमंत्री शंकररराव गडाख यांनी नेवाशात मतदानाचा हक्क बजावला.