मुरूम वाहतूकप्रकरणी चौघांवर गुन्हा; तब्बल 34 लाख रुपयांंचा मुद्देमाल जप्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथील वनविभागाच्या जागेतून मुरुम वाहुन नेणार्या चौघांविरुद्ध वनविभागाने वन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
रविवारी रात्री अकरा वाजता केलेल्या कारवाईत एक जेसीबी, तीन ट्रॅक्टर, असा 34 लाख रूपयांचा मुद्देमाल वन अधिकार्यांनी जप्त केला आहे. सुरेश बन्सी कावळे, भाऊसाहेब जगन्नाथ बडे, ज्ञानेश्वर आत्माराम गरड व परमेश्वर आत्माराम गरड (सर्व रा. वडगाव) यांच्या विरुद्ध भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 26, 41,42 व 52 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनपरीक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांच्या नेतृत्वाखालील ही कारवाई करण्यात आली.
वन विभागाकडून पहिल्यांदाच अशी कारवाई झाली आहे. कारवाईनंतर महिला वन कर्मचार्यांनी रात्री ट्रॅक्टरवर बसून वाहने पाथर्डीला आणली. तालुक्यातील वडगाव हे गाव पाथर्डीपासून सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर दूर असून, बीड जिल्ह्याच्या हद्दीला लागून आहे. येथे वनविभागाच्या राखीव वनात मुरूमचोरी होत असल्याची खबर रविवारी रात्री नऊ वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांना मिळाली.
त्यानंतर अरुण साबळे, आप्पासाहेब घनवट, विजय पालवे, वर्षा गिते, सविता रायकर हे रात्री साडेदहा वाजता वडगाव येथे पोहचले. तेथे एक जेसीबी मशीन मुरूम काढत होता. तर तीन ट्रॅक्टर मुरूम वाहून नेत होते. मुरूमाची चोरी करणार्यांना पकडून वाहनांसह पाथर्डीच्या कार्यालयातआण्णयात आले. सोमवारी सकाळी पंचनामा करण्यात आला. या कारवाईसाठी वनविभागाचे नारायण दराडे, सुधाकर घोडके, मनिषा शिरसाट, नौशाद पठाण यांनी सहकार्य केले.