बँक फोडण्याचा प्रयत्न;लॉकर न उघडता आल्याने चोरी टळली
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील बँक ऑफ बडोदा शाखेत चोरीचा प्रयत्न फसला. शुक्रवार रात्री एक ते दोनच्या दरम्यान ही घटना घडली. लॉकर न उघडता आल्याने चोरी टळली आहे.
दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत.
बँकेच्या उत्तर बाजूच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला.
कॅशियर केबिन, लॉकर रूममध्ये जाऊन लॉकर रूमचा दरवाजा तोडला. लॉकर रूमला आणखी दोन दरवाजे असल्याने त्यांना तिजोरीपर्यंत जाता आले नाही.लॉकर न उघडता आल्याने कुठल्याही मौल्यवान वस्तू अथवा पैसे चोरी गेले नाहीत. दरम्यान, डोक्यात टोपी घातलेला चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला असून, चोरट्यांनी तोंडाला मास्क बांधल्याचे दिसलेे.
कर्मचारी सकाळी बँकेत आल्यावर ही घटना निदर्शनास आली. लागलीच बँक व्यवस्थापक सचिन शिंदे यांना माहिती देण्यात आली. यावेळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले. मागील बाजूस जाऊन पुरंदरे रस्त्यापर्यंत श्वानाने माग काढला. यावेळी सोनई पोलिस ठाण्याचे निरीक्षक माणिक चौधरी, शनिशिंगणापूर ठाण्याचे सहायक निरीक्षक रामचंद्र करपे यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी विठ्ठल थोरात,आडकित्ते व इतर पोलिस कर्मचारी हजर होते. याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक सचिन शिंदे यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सोनई सहायक निरीक्षक दत्तात्रय गावडे व कर्मचारी करीत आहे.