महाराष्ट्र
वर्षाचा प्रत्येक दिवस हा स्रीसन्मानाचा असावा. कविता आव्हाड
By Admin
वर्षाचा प्रत्येक दिवस हा स्रीसन्मानाचा असावा. कविता आव्हाड
पाथर्डी- प्रतिनिधी-
जागतिक महिला दिनाची
सुरुवात महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी केलेल्या आंदोलनातून झाली असली तरी आजही समाजात स्रीला सन्मानासाठी झगडावे लागते, ही भूषणावह बाब नाही. जीवनात स्रीचे महत्व हे अनन्यसाधारण असून वर्षातून फक्त एक दिवस महिला दिन साजरा करून तिची महती नक्कीच गायली जाण शक्य नाही. यासाठी वर्षाचा प्रत्येक दिवस हा स्रीसन्मानाचा, स्रीच्या कलागुणांना वाव देणारा, तिची प्रतिष्ठा वाढवणारा हवा, असे प्रतिपादन येथील मैत्रेयी ग्रुपच्या अध्यक्षा कविता आव्हाड यांनी केले. त्या बाबुजी आव्हाड महाविद्यालयात जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित भव्य वेशभूषा स्पर्धा कार्यक्रमात बोलत होत्या.
व्यासपीठावर उज्ज्वला शेवाळे, मोनिका गुगळे, रेखा कुचेरीया, कांचन येळाई, लीना गुगळे, कविता येळाई, शर्मिला गर्गे, अरुणा मंत्री, स्वाती गांधी, मीना निरहाळी, डॉ. लांडे आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.
कविता आव्हाड पुढे म्हणाल्या, महिलांच्या सकारात्मक विचारांचा प्रभाव त्यांच्या घरावर तसेच समाजावर पडत असतो. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. महिलांनी येथून पुढे सामाजिक कार्यासाठी अग्रेसर भूमिका घेऊन राष्ट्रबांधणीत आपला मोलाचा सहभाग नोंदवावा, अशा त्या शेवटी म्हणाल्या.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुली आणि युवतींसाठी येथील मैत्रेयी ग्रुपने भव्य वेशभूषा स्पर्धेचे आयोजन बाबुजी आव्हाड महाविद्यालयात करण्यात आले. प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थिनीपासून महाविद्यालयीन युवतींनी या स्पर्धेत भाग घेऊन वेगवेगळ्या वेशभूषा सादर केल्या. या स्पर्धेत प्राथमिक विभागात अनन्या तरवडे हिने प्रथम, श्रीजा तुपे हिने द्वितीय तर श्रुती शिरसीम हिने तृतीय क्रमांक मिळविला. माध्यमिक विभागात धनश्री वैद्य, राजनंदिनी परदेशी व पल्लवी खेडकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. जुनिअर विभागात सुवर्णा काटकर हिने प्रथम, श्रद्धा गर्जे हिने द्वितीय तर दर्शिका फलके हिने तृतीय क्रमांक मिळविला. सिनियर विभागात आदिती लोहकरे, सानिका फुंदे, ऋतुजा आव्हाड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेचे परीक्षण मयुरी धायतडक यांनी केले.
याप्रसंगी अरुणा मंत्री, उज्ज्वला शेवाळे, मोनिका गुगळे, स्वाती गांधी यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाची विद्यार्थिनी शीतल राजेंद्र खेडकर हिची एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी भारतरत्न लता मंगेशकर यांना मैत्रेयी ग्रुपतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा पालवे, सुत्रसंचालन माया पवार तर आभार आम्रपाली कांबळे यांनी मानले.
Tags :
8569
10