शेवगाव तालुक्यातील 'या' गावातील चोरटे पकडून दहशत संपवा ; ग्रामस्थांचे उपोषण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव नजिक गमे वस्ती आणि गर्जे वस्तीवर चोरट्यांनी महिला व पुरूषांना मारहाण करून दहशत निर्माण केली होती. या चोरट्यांना पकडून त्यांची दहशत संपवा, या मागणीसाठी शंकर माणिकराव गमे आणि अंबादास भानुदास गर्जे यांनी त्यांच्या कुटुंबियांसह बोधेगाव पोलिस दूरक्षेत्रासमोर उपोषण केले.
सायंकाळी सहा वाजता सहाय्यक फौजदार भगवान बढदे यांनी सहायक पोलिस निरिक्षक विश्वास पावरा यांच्याशी उपोषणकर्त्यांचे बोलणे करून दिले. यावेळी भाजपा चे ज्येष्ठ नेते कासम शेख यांनी यशस्वी मध्यस्थी केली. पोलिस नाईक उमेश गायकवाड, कॉन्स्टेबल धोत्रे, राजेंद्र ढाकणे हे दररोज या वस्त्यांवर रात्रीची गस्त घालत आहेत.
चोरट्यांचा सुगावा लागला असून, या घटनेतील चोरटे लवकरच पकडून जेरबंद करू, असे आश्वासन सहाय्यक फौजदार भगवान बढदे यांनी दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले. बोधेगावपासून भगवानगड रस्त्यावर तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गमे आणि गर्जे वस्तीवर 29 जुलै रोजी पहाटे 3 च्या दरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घालून महिला व पुरूषांना मारहाण करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटली होती.