महाराष्ट्र
पाथर्डी- मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत नव्या १२ गावांचा समावेश;१५५ कोटी ५९ लाखाची तांत्रिक मान्यता
By Admin
पाथर्डी- मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत नव्या १२ गावांचा समावेश;१५५ कोटी ५९ लाखाची तांत्रिक मान्यता
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
योजनेत नव्याने १२ गावांचा समावेश केला आहे. योजनेत आता ४३ गांवे १८६ वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. लवकरच प्रशासकीय मान्यता मिळून निविदा प्रक्रिया सुरू होईल. असे नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत १५५ कोटी ५९ लाखांची तांत्रिक समितीची मान्यता मिळाली आहे.
राहुरी येथे पत्रकार परिषदेत बोलतांना मंत्री तनपुरे म्हणाले, "तिसगांवचे सरपंच काशिनाथ लवांडे यांनी माझ्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत सुमारे पंधरा बैठका घेऊन, योजनेतील त्रुटी दूर केल्या. या योजनेविषयी विधानसभेत पहिला लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. योजनेच्या वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी प्रयत्नशील आहे."
मुळा धरणातून योजनेसाठी उचललेले शंभर पैकी अवघे २५ लिटर पाणी पोचते. पंधरा-वीस दिवसांनी पाणी मिळते. योजनेच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होते. हे टाळण्यासाठी मुळा धरण ते जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान साडे सव्वीस किलोमीटर मुख्य जलवाहिनी जमिनीवर घेतली जाईल. चिचोंडी पासून तिसगावपर्यंत स्वतंत्र जलवाहिनी होईल. योजनेत खांडगाव, जोहारवाडी, सातवड, कवडगाव, त्रिभुवनवाडी, निंबोडी, देवराई, घाटशिरस, शिरापूर, करडवाडी, पवळवाडी, डमाळवाडी ही नवीन गावे समाविष्ट आहेत."
राहुरी तालुक्यातील सोनगाव-धानोरे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला सुद्धा २७ कोटींची तांत्रिक मान्यता मिळाली आहे. राहुरी शहराच्या पाणी योजनेचे काम वेगाने प्रगती पथावर आहे. ब्राह्मणी व सात गावे योजनेची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेची मुख्य जलवाहिनी प्लास्टिक ऐवजी लोखंडी करून, चेडगाव व मोकळओहोळ या दोन गावांचा नव्याने समावेश केला आहे." असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील विरोधक ईडीची भीती दाखविण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत. तर, महाविकास आघाडी शासन विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. विरोधकांच्या ईडीला विकास कामांतून उत्तरे देणार आहे.
- प्राजक्त तनपुरे, नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री
Tags :
46874
10