नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वर्षातून किमान दोनदा रक्तदान करावे- आर्य भांडकर
पाथर्डी - प्रतिनिधी
मानवी शरीरा व्यतिरिक्त जगामध्ये कुठेही कृत्रिम रित्या रक्त तयार होत नाही. यामुळे विविध प्रकारच्या रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रक्ताची गरज केवळ मनुष्यच भागवू शकतो.यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने वर्षातून किमान दोनदा रक्तदान करावे,असे आवाहन आर्य भांडकर यांनी केले.
गोदावरी अर्बनचे संस्थापक खा.हेमंत पाटील,अध्यक्षा राजश्री पाटील,व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर व मार्केटिंग मॅनेजर महेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली,पाच राज्यातील गोदावरी अर्बनच्या ९१ शाखेमध्ये रक्तदानाचा उपक्रम राबवण्यात आला.पाथर्डी शाखेमध्ये अहमदनगर ब्लड बँकेने बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री भांडकर बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक डॉ.बंडू भांडकर,संदीप आव्हाड,मुकुंद गर्जे,देवेंद्र खाटेर,विकास बोरुडे,शुभम सुपेकर,अमोल बोरुडे बँकेचे शाखा अधिकारी बालाजी खराटे,आरती पुंड,ऋषिकेश पवार,अशोक पानखडे,अनुजा पाथरकर,वेदांत राऊत,अक्षय बालवे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना भांडकर म्हणाले की,भारत देश हा युवकांचा देश म्हणून जगभर ओळखला जातो.युवकांनी ठरवले तर काहीच अशक्य नाही.यामुळे युवकांनी रक्तदान चळवळ ही लोक चळवळ करण्यासाठी पुढाकार घ्यावा व रक्ताची कधीही कमतरता भासणार नाही, यासाठी प्रत्येकाने वर्षातून दोनदा रक्तदान करून या चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन केले.
आजच्या आधुनिक युगात देखील समाजामध्ये रक्तदानाविषयी अनेक गैरसमज आहेत.ते दूर होणे गरजेचे आहे.रुग्णांना व रक्तदात्यांना रक्तदानापासून होणाऱ्या विविध फायद्याविषयी माहिती सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले.