महाराष्ट्र
क्रिप्टो ट्रेडिंग, शेअर द्वारे लाखोंची फसवणूक; दहाजणांविरुद्ध गुन्हा
By Admin
क्रिप्टो ट्रेडिंग, शेअर द्वारे लाखोंची फसवणूक; दहाजणांविरुद्ध गुन्हा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेअर व क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर कमिशन व फायदा मिळवून देतो, असे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
विशाल प्रकाश पवार (रा. श्रीरामपूर) यांनी न्यायालयात जुलै-2021 मध्ये फिर्याद दिली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार सुशीलकुमार केशव शिसोदिया, शैलेश व सुषमा सुशीलकुमार शिसोदिया (सर्व रा. परभणी), नामदेव दत्तात्रय नाईक-पाटील (रा. परभणी), नितीन बाळासाहेब लांडे (रा. श्रीरामपूर), अशोक सूर्यभान डांगे, बेबी अशोक डांगे (रा. पुणतांबे, ता. राहाता) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सुशीलकुमार व शैलेश शिसोदिया यांच्या सी. सी. ट्रेडर्समध्ये पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे लांडे व डांगे यांनी सांगितले. त्यानुसार आपण बँकेचे 30 लाख रुपयांचे कर्ज व साडेचार लाख रुपये नातेवाईकांकडून उसनवार घेऊन 22 लाख 84 हजार 500 व देशमुख यांनी 16 लाख 17 हजार 500 रुपये शिसोदिया यांच्या फर्मच्या खात्यावर जमा केले. त्यांनी आम्हाला 8 लाख 64 हजार 564 रुपये व देशमुख यांना एक लाख 99 हजार 516 रुपये परत केले. कमिशनपोटी ट्रेडिंग प्रॉफिट म्हणून 24 महिने प्रत्येक महिन्याला दोन
लाख 82 हजार 30 रुपये देणार व एकूण ट्रेडिंग प्रॉफिट म्हणून 67 लाख 68 हजार 720 रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यापोटी पाच लाख 64 हजार 60 रुपयांचा धनादेश व आगाऊ तारखेचे सात धनादेश दिले. पैकी दोन धनादेश वटले नाहीत. वेळोवेळी पैशांची मागणी केली. मात्र, आरोपींनी बहाणा करून रक्कम देण्याचे टाळले. पैसे परत देण्याचा करारनामाही करून दिला. मात्र, आरोपींनी संगनमताने अपहार करून फसवणूक केली.
दुसरी तक्रार कुलदीप लक्ष्मण सोळसे (रा. श्रीरामपूर) यांनी दिली असून, सचिन प्रल्हाद जगतकर (कम्युनिटी कॉमर्स ट्रेडर्स प्रा. लि., संभाजीनगर), राजेश अरुण बारस्कर (रा. जळगाव), किरण बाबासाहेब नवले (रा. श्रीरामपूर) यांनी कम्युनिटी कॉमर्स ट्रेडर्स प्रा. लि. कंपनीमध्ये संगनमत करून व विश्वास संपादन करून 22 लाख 31 हजार गुंतवणूक म्हणून घेतले. ठरल्याप्रमाणे परतावा दिला नाही. न्यायालयाच्या आदेशाने शहर पोलिसांनी दहाजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Tags :
37016
10