महाराष्ट्र
सदानंद सुतार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
By Admin
सदानंद सुतार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील गोपीनाथ लॉन्स येथे श्री रत्न विद्यार्थी नगर माणिकदौंडी या वस्तीगृहाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
श्री रत्न विद्यार्थी नगर माणिकदौंडी चे अधिक्षक श्री सदानंद शंकर सुतार यांना भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभहस्ते व सेक्रेटरी श्री सतीशजी गुगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.
प्रास्ताविकामध्ये श्री राजू पवार यांनी सुतार सरांनी केलेले ज्ञानदानाचे कार्य,सामाजिक कार्य व परिसरामध्ये प्रत्येक घराच्या सुख दुःख मध्ये घेतलेला सहभाग व त्यागाची माहिती उपस्थितांना माहिती दिली. त्यावेळेस संपूर्ण सभागृह हा भावुक झाला होता.गुरुवर्य सुतार सरांच्या ज्ञानदानानेव त्यांनी दिलेल्या संस्काराने आज विविध क्षेत्रात शेकडो विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत.
यावेळी माजी विद्यार्थी श्री अर्जुन चितळे,श्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी विद्यार्थी सरांचे अनुभव सांगत असताना संपूर्ण सभागृह भावनिक झाले होते.
सत्कारमूर्ती सुतार सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की मी जीवनात पैसा कमावला नाही पण एवढी मुले घडवली हीच माझी खऱ्या अर्थाने श्रीमंती आहे.माझ्या जवळ साधी मोटारसायकल नाही पण आज माझे हजारो विद्यार्थी चार चाकीत फिरत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे.यावेळी सरांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून आपला दिव्यांग विद्यार्थी सहाय्यक निबंधक एकनाथ माणिक राठोड यांचा सपत्नीक सत्कार केला.यावेळी संपूर्ण सभागृहातील प्रेक्षक अक्षरशः धाय मोकलून रडले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव मा.श्री.सतिशजी गुगळे यांनी गुरू आणि शिष्य यांचे अतूट प्रेम असलेला सोहळा माझ्या आयुष्यात आजपर्यंत तरी पाहण्यात आलेला नाही.संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांसाठी सुतार सरांचे प्रामाणिक कार्य हा एक आदर्श आहे.सचिव या नात्याने अशा कर्मचाऱ्याचा गौरव करणे हे भाग्य समजतो असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवनगौरव पुरस्कारप्राप्त सरपंच मा. भास्करराव पेरे पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की समाजात पिढी घडविण्याचे काम गुरू करीत असतात.त्यामुळे गुरुचे स्थान खूप महत्वाचे आहे. तसेच गावाचा कायापालट करण्यासाठी ग्रामपंचायतीची भूमिका फार मोलाची ठरते यासाठी ग्रामसेवक व सरपंच यांनी पुढाकार घेणे खूप गरजेचे आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी काळू जाधव, बाळासाहेब राठोड, विजय राठोड, सुनील राऊत,विजय पवार, सुधाकर पवार, रोहिदास जाधव,रमेश पटेल, शायद पठाण, समीर पठाण, अमोल शेळके, पोपटी चव्हाण, संदिप राठोड, गणेश राठोड,किशोर राठोड, दिलावर पठाण यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी माणिकदौंडी पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच,सदस्य, माजी विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल पवार व अतुल राठोड यांनी केले.तर वसंत वाघमारे यांनी आभार मानले.
Tags :
6103
10