महाराष्ट्र
429 'या' शाळाखोल्यांच्या बांधकामांना मंजुरी;पाथर्डी शेवगाव, पारनेर, नगर, संगमनेर, नेवाशात सर्वाधिक खोल्या
By Admin
429 'या' शाळाखोल्यांच्या बांधकामांना मंजुरी;पाथर्डी शेवगाव, पारनेर, नगर, संगमनेर, नेवाशात सर्वाधिक खोल्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समितीमधून चालू आर्थिक वर्षात शाळाखोल्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. मंजूर निधीतून संगमनेर आणि अकोले तालुक्यांत प्रत्येक शाळाखोलीसाठी 10 लाख रुपयांप्रमाणे, तर उर्वरित तालुक्यात नियमित नऊ लाख 50 हजार रुपयांप्रमाणे शाळाखोल्यांच्या कामांना निधी मंजूर करण्यात आलेला आहे. निर्लेखन, बसण्यास योग्य नसणे, भाडोत्री ठिकाणी, समाजमंदिरात अथवा अन्य ठिकाणी भरणारे वर्ग अशा ठिकाणी प्राधान्याने शाळाखोल्यांसाठी निधी द्यावा, असे संकेत आहेत.
नगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीमधून शाळाखोल्यांसाठी मिळालेल्या निधीतून 429 शाळाखोल्यांच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील 429 शाळाखोल्यांसाठी निधी मिळाला असला, तरी इतर शाळांचा प्रश्न अद्यापि प्रलंबित राहणार असल्याने सर्व शाळा कधी पूर्ण होणार?
हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
अनेक ठिकाणी असलेल्या शाळाखोल्यांचा प्रश्न तूर्तास प्रलंबित आहे. जिल्ह्यात जवळपास 1500च्या वर शाळा आहेत. 429 शाळांचा प्रश्न मार्गी लागणार असला, तरी इतर शाळांमधील विद्यार्थ्यांना काही ठिकाणी जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागते, ही परिस्थिती आहे. बालवाडय़ांची अवस्था तर त्यापेक्षा हलाखीची आहे. काही ठिकाणी पत्र्याच्या शेडखाली बालवाडय़ा भरविल्या जात आहेत. या बालवाडय़ांना निधी कधी उपलब्ध होणार आहे, याकडे अंगणवाडीसेविकांचे लक्ष लागून आहे.
जिल्ह्यात सध्या एक हजार 868 शाळाखोल्या नाहीत. यांत सर्वाधिक नगर तालुक्यातील 282, नेवासा तालुक्यातील 212, जामखेड 172, शेवगाव 159, पारनेर 154, पाथर्डी 140, राहाता 139, संगमनेर 135, अकोले 127, कोपरगाव 91, राहुरी 89, श्रीगोंदा 63, कर्जत 59 आणि श्रीरामपूर तालुक्यातील 46 शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यात 623 शाळांमध्ये शाळाखोल्यांची गरज असून, चालू वर्षात जिल्हा नियोजन समितीमधून 429 वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या आहेत. यांत सर्वांत कमी वर्गखोल्या जामखेड आणि कर्जत तालुक्यांत प्रत्येकी आठ असून, श्रीरामपूर तालुक्यात केवळ नऊ वर्गखोल्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे. राहाता तालुक्यातही 17 शाळाखोल्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे.
तालुकानिहाय मंजूर शाळाखोल्या
अकोले 36, संगमनेर 45, कोपरगाव 24, राहाता 17, श्रीरामपूर 9, राहुरी 21, नेवासा 39, शेवगाव 65, पाथर्डी 25, कर्जत आणि जामखेड प्रत्येकी 8, श्रीगोंदा 31, पारनेर 53, तर 48 नवीन शाळाखोल्यांची संख्या आहे.
एकेका खोलीसाठी झेडपी सदस्यांचा संघर्ष
10 ते 12 वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळाखोल्या बांधकामासाठी केंद्र सरकारच्या 'सर्व शिक्षा अभियाना'तून बक्कळ निधी येत होता. त्यावेळी सदस्यांनी मागणी करण्याच्यापूर्वी त्या ठिकाणी शाळाखोल्या मंजूर होत होत्या. त्यावेळी केवळ बांधकाम विभागाच्या 'बसण्यास अयोग्य' या एका दाखल्यावर नवीन शाळाखोली मंजूर होत होती. आता केंद्राकडून निधी येणे बंद झाल्यानंतर एकेका शाळाखोलीसाठी जिल्हा परिषद सदस्यांना संघर्ष करावा लागत आहे.
Tags :
416
10