अहमदनगरचे धूत चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पाथर्डी येथील कलाकारांना किराणा वाटप
पाथर्डी प्रतिनिधी-
पाथर्डी शहरातील अष्ट भैरवनाथ हॉटेलमध्ये सेठ माधवलाल धूत चॅरिटेबल ट्रस्ट व श्री. रामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्ट कडून तालुक्यातील संगीत क्षेत्रांमधील कलाकारांना नुकतेच किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
अहमदनगर येथील सेठ माधवलाल व श्री. रामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सध्या चालू असलेल्या लॉकडाऊन च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ४०० गरजू कलाकार परिवारांना किराणा सामान चे वाटप जीवन कला प्रकल्प- कलाकार अन्नपूर्णा योजनेतून 'ही मदत नव्हे कर्तव्य आहे' या उपक्रमात करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने बुधवारी पाथर्डी तालुक्यातील अनेक गरजू कलाकारांना १० किलो गहू, ३ किलो तांदूळ, ३ किलो तूर डाळ व २ लिटर खाद्य तेल असे किराणा साहित्य प्रत्येकी देण्यात आले.
आतापर्यंत धुत ट्रस्टच्यावतीने राहुरी, श्रीरामपूर, बेलापूर, शेवगाव ,पाथर्डी, लोणी, संगमनेर, घोडेगाव, कुकाणा, चांदा, भेंडा, तिसगाव, करंजी, भिंगार, श्रीगोंदा, कर्जत इत्यादी ठिकाणच्या कलाकारांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
लॉकडाउन पुन्हा सुरू झाल्याने आणि त्यात संगीत क्षेत्रातील व्यवसाय बंद असल्याने ज्यांचे हातावर पोट आहे, अशा अनेक गरजू कलाकारांच्या कुटुंबांना आर्थिक चणचण भासू लागली व रोजीरोटी बंद असल्याने त्यांची निकड लक्षात घेऊन त्यांना शासनाचे सर्व नियम पाळून नगरचे सुप्रसिद्ध संगीत अलंकार पवन नाईक व पाथर्डी चे ख्यातनाम कलाकार संगीत विशारद जनार्दन बोडखे यांच्या हस्ते पाथर्डी येथील कलाकारांना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.
यावेळी साऊंड सिस्टिम चे संचालक व गायक रवि जाधव, जनार्दन बोडखे, ह. भ. प. संजय वारे महाराज, संजय उरसुळे, दत्ता शिळवणे, तुषार पालवे आदी उपस्थित होते.