हनीट्रॅप प्रकरणात तरुणीसह पाच जणांवर गुन्हा दाखल, क्लास वन अधिका-याचाही समावेश
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 19 मे 2021,बुधवार
नगर : तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हनीट्रॅपमध्ये एका अधिकार्यास ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. या अधिकार्याने हिम्मत दाखवत तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ब्लॅकमेलर टोळीतील पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अधिकार्याकडे तीन कोटींची खंडणी त्या तरूणीने मागितली होती. दोन कोटी देण्याचे त्या अधिकार्याने कबूल केले होते. त्यातील 80 हजार रूपये त्याने दिले होते. संबंधित तरूणीसह एजंट अमोल सुरेश मोरे, सचिन भिमराज खेसे (रा. हिगंणगाव ता. नगर), सागर खरमाळे, महेश बागले (दोघे रा. नालेगाव, नगर) यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. सचिन खेसे याला पोलिसांनी अटक केली आहे.
खेसे याने क्लासवन अधिकार्याची व तरूणीची ओळख करून दिली. त्यानंतर तरूणीने या अधिकार्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दोघांमधील ‘नाजूक’ संबंधाचा व्हिडीओ तयार करण्यात आला. त्याच्या आधारे धमकावत अधिकार्याकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली. तीन कोटी न दिल्यास पोलिसांना व्हिडीओ दाखवून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याचीही धमकी दिली. धमकी आणि व्हिडीओ पाहून भेदरलेल्या अधिकार्याने दोन कोटी देण्याची तयारी दर्शविली. ही धमकी देताना अधिकार्याच्या कारमधील तीस हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. त्यानंतर बळजबरीने 50 हजार रूपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. तपासी अधिकारी राजेंद्र सानप यांनी या प्रकरणाचा अत्यंत गोपनीय तपासात या अधिकार्याची फिर्याद दाखल करून घेण्यात आली. त्यानंतर खेसे याला अटक केली. त्याच्याकडे विचारपूस करता त्याने आणखी दोघांची (बागले, खरमाळे) यांची नावे पोलिसांनी सांगितली. पोलीस त्यांच्या घरी पोहचले, पण तोपर्यंत ते पसार झाले होते.