दिलासादायक बातमी- अहमदनगर जिल्ह्यासाठी २५ हजार लसीचे डोस झाले प्राप्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 25 एप्रिल 2021
अहमदनगर जिल्ह्यासाठी लसीची मोठी मागणी आहे. मात्र त्या प्रमाणात पाहिजे तेवढे डोस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी होते.
दरम्यान शनिवारी सायंकाळी नाशिक येथून नगरसाठी २५ हजार लसीचे डोस प्राप्त झाले. शनिवारी रात्री उशिरा हे डोस नगर जिल्हा परिषदेमध्ये उतरवण्यात येणार होते. रविवारी सकाळी नगर शहरासह जवळच्या तालुक्यात त्याचे वाटप होणार आहे.
अकोले, कोपरगाव, संगमनेर, जामखेड अशा लांबच्या तालुक्यात लस रविवारी वाटप होईल, मात्र त्याचे लसीकरण सोमवारी होऊ शकते.
दरम्यान नगर जिल्ह्यासाठी लागणारी कोरोना प्रतिबंधक लस पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट (कोविशिल्ड) तसेच भारत बायोटेककडून (कोव्हॅक्सिन) येते.
आतापर्यंत ३ लाख ३४ हजार ४०० डोस कोविशिल्ड,
तर ७३ हजार ९८० डोस कोव्हॅक्सिनचे नगर जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहेत. २० एप्रिलला अखेरचे २२ हजार ३१० डोस प्राप्त झाले होते.
ते डोस त्या दिवशी लसीकरण केंद्रांना वाटप करण्यात आले. त्यानंतर मात्र लसीचा पुरवठा झालेला नव्हता. त्यामुळे ग्रामीणसह नगर शहरातील बरीचशी केंद्रे शुक्रवार, शनिवारी बंद होती.