महाराष्ट्र
40221
10
दादापाटील राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर पुणे विभागीय
By Admin
दादापाटील राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर पुणे विभागीय उत्कृष्ट प्राचार्य म्हणून सन्मानित
पाथर्डी तालुका न्यूज नेटवर्क-
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील विविध महाविद्यालयांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राचार्यांचा या वेळी गौरव करण्यात आला. त्यामध्ये आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांना पुणे विभागीय उत्कृष्ट प्राचार्य म्हणून सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान त्यांच्या प्रभावी नेतृत्व, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी तसेच करिअर कट्टा उपक्रमातील सक्रिय सहभाग याबद्दल प्रदान करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर यांना मा. डॉ. नामदेव भोसले, सहसचिव, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व मा. श्री. रुपेंद्र मोरे संचालक, शासकीय मुद्रण आणि स्थिर प्रकाशन संचालनालय, मुंबई आणि करिअर कट्टाचे अध्यक्ष मा. श्री. यशवंत शितोळे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. या सोहळ्यास मा. श्री सचिन इटकर, क्षेत्रीय संचालक, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ, मुंबई तसेच मा. सोनाली लोहार Audiologist, Voice Therapist, मा. श्री मंदार फणसे Editor, News 18 Lokmat, मा. मिथिला दळवी संस्थापिका, संवाद - अ डायलॉग, मा. डिंपल मित्तल तज्ज्ञ मार्गदर्शक, आर्थिक साक्षरता या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला.
प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी या सन्मानाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. श्री. दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आ. आप्पासाहेब राजळे (काका), शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शक तथा पाथर्डी–शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मा. मोनिकाताई राजीव राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे डॉ.राजधर टेमकर यांनी सांगितले. तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी दिलेला विश्वास, सहकार्य आणि सातत्यपूर्ण पाठबळ यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेच्या मूल्याधिष्ठित धोरणांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थी-केंद्रित उपक्रम राबविण्यास बळ मिळाले, असेही त्यांनी सांगितले. भविष्यातही संस्थेच्या ध्येय-धोरणांनुसार कार्य करत महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री. दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आ. आप्पासाहेब राजळे (काका), आमदार मा. मोनिकाताई राजीवजी राजळे, विश्वस्त मा. राहुलदादा राजळे, सचिव मा. नितीन शिंदे,माजी सचिव मा. रविंद्र महाजन,महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. शिवाजीराव राजळे, मार्गदर्शक मा. भास्करराव गोरे तसेच सर्व संचालक मंडळ आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या सन्मानामुळे दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आल्याचे अधोरेखित झाले असून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे.
Tags :
40221
10




